नेताजींच्या पुस्तकाचा वाद


निवेदन -
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या गुढाबद्दले माझे आकर्षण जुनेच. किमान १५ वर्षे त्याबद्दल मिळेल ते मी वाचत आहे. अनुज धर यांचे लेख आणि पुस्तके हा त्या वाचनाचाच एक भाग होता. मोदी सरकारने नेताजींबद्दलच्या गोपनीय फाईली हो ना करता अखेर खुल्या केल्या. त्यातील अनेक कागदपत्रेही मी वाचली. त्यातून लक्षात येऊ लागले की हे गूढ म्हणजे केवळ कॉन्स्पिरसी थेअरी - षड्‌यंत्र सिद्धांत - आहे. त्यातूनच मग लोकसत्ता दिवाळी अंकासाठी मी एक दीर्घलेख लिहिला. त्याला बराच काळ लोटला. उलट्यासुलट्या अनेक प्रतिक्रिया आल्या त्यावर. तशातच पुन्हा माझ्या हाती लागले ते आशीष रे यांचे नेताजींच्या मृत्यूरहस्याविषयीचे पुस्तक. लेड टू रेस्ट. त्याचा परिचय मी लोकसत्ताच्या बुकमार्क पानातून करून दिला. अनेकांना तो आवडला. काहींना नावडला.  ज्येष्ठ पत्रकार आणि पुस्तक संपादक श्री. आनंद हर्डीकर यांनी त्या लेखाला झोडून काढणारा लेख लिहिला. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि फीचर्स संपादक अभिजीत ताम्हणे यांनी तो लोकसत्ताच्या भूमिकेनुसार छापला. आता त्या लेखाला प्रत्युत्तर देणे भागच होते. ते मी दिलेही. श्री. हर्डीकर यांनी त्याचा प्रतिवाद न केल्यामुळे तो छापील वाद तेथेच संपला. ते हे लेख. त्यातील पहिल्या लेखाचा मथळा होता - वादावर पडदा. ही एक गंमतच म्हणायची....

०००००


वादावर पडदा!

० रवि आमले

सत्याला कधी मरण नसतं म्हणतात. नसेलही. आजच्या बनावट बातम्या आणि अपमाहितीच्या काळात त्याबाबत खात्रीनं काही बोलणं कठीणच. पण एक बाब नक्की सांगता येते, की सत्याला मरण नसले, तरी त्याला काळकोठडी नक्की असते. काही सत्यं तिथंच कायमची खितपत पडतात. क्वचितच काहींना सूर्यप्रकाश दिसतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युविषयीच्या सत्याचं असंच. १८ ऑगस्ट १९४५ ला त्यांचा मृत्यू झाला की नाही?ते विमान अपघातात गेले की अन्य कुठं त्यांचं देहावसान झालं?आजवर हे सत्य असंच अंधारात पडून होतं. बाहेर जे मिरवले जात होते ते होते षड्यंत्र सिद्धांत.

१९४९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री या नात्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. पण लोकांच्या मनातील नेताजींची प्रतिमा त्यांना त्या कटू सत्यावर विश्वास ठेवू देत नव्हती. या लोकांमध्येही दोन प्रकार होते. काही खरोखरच भाबडे होते आणि काही राजकारणी होते. नेताजींच्या मृत्यूबाबतचं गूढ जागतं ठेवण्यामागील त्यांचे हेतू वेगवेगळे होते. नेताजींचे बंधु सुरेशचंद्र बोस, कट्टर अनुयायी एच. व्ही. कामथ यांच्यासारख्यांचा नेताजी हयात असण्यावरचा विश्वास वेगळा होता. ते आशेवर जगत होते आणि त्या आशेला मिळतील त्या ख-या-खोट्या माहितीचे टेकू देत होते. बाकीच्या मंडळींचे हेतू तेवढे सरळ नव्हते. त्यांना वैयक्तिक हेवेदाव्यांची किनार होती. पं. बंगालमधील शालमारीबाबा म्हणजे नेताजी असं सांगणा-यांचे हेतू तर स्पष्टच फसवणुकीचे होते. अनेकांसाठी नेताजींच्या मृत्यूचं गूढ हे सत्ताकारणातलं शस्त्र बनलं होतं. आजही ते अधुनमधून, सहसा निवडणुकांच्या तोंडावर उपसलं जातं. या पार्श्वभूमीवर आशिष रे यांचं ‘लेड टू रेस्ट’हे ताजं पुस्तक महत्त्वाचं ठरतं.

काय लिहिलंय यापेक्षा कोणी लिहिलंय यावरून लिखाण जोखण्याची आपल्याकडची रीत आहे. विचारांवर हल्ले करायचे तर त्यासाठी विचार घेऊनच मैदानात उतरावं लागतं. त्यापेक्षा व्यक्तिगत शिविगाळ केली की काम भागतं. आपल्याकडील वैचारिक वादाची पद्धत असल्यानं हे सांगायला हवं, की आशिष रे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. बीबीसी, सीएनएन पासून आनंद बझार पत्रिका, टाइम्स ऑफ इंडिया अशा विविध वृत्तपत्रसमूहांसाठी त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ परराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. नेताजी हा त्यांच्या कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ३० वर्षांच्या संशोधनाची फलश्रुती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना. जर्मन अर्थशास्त्रज्ञ प्रो. डॉ. अनिता पाफ यांनी ती लिहिलीय. नेताजी ऑगस्ट १९४५ नंतरही हयात होते असे मानणा-यांच्या हेतूंबाबत सहानुभूती ठेवून त्या सांगतात, की १८ ऑगस्ट १९४५ रोजी फार्मोसातल्या (आताचं तैवान) तैहोकू विमानतळावर झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला हीच आजवरच्या सर्व पुराव्यांतून समोर आलेली सुसंगत गोष्ट आहे. त्याही पुढे जाऊन त्या सांगतात, की इतिहाकार आणि नेताजींचे चरित्रकार प्रो. लिओनार्ड गॉर्डन यांनी त्या अपघातातून बचावलेल्या एका जपानी सैनिकाची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्या स्वतः तिथं होत्या. त्या सांगतात, की त्या मुलाखतीनं नेताजींच्या मृत्यूचं वास्तव लख्खपणे त्यांच्यासमोर उभं केलं. नेताजींवर हक्क सांगणा-या लोकांसाठी हे सांगायलाच हवं, की डॉ. अनिता पाफ या नेताजींच्या एकुलत्या एक कन्या आहेत.

रे यांच्या या संशोधनपर पुस्तकाचे आपापतः काही विभाग पडतात. त्यात नेताजींच्या मृत्यूबाबत उठवलेल्या वावड्या, त्यांचे तोतये, तत्कालिन गुप्तचर संस्थांनी घातलेले घोळ यांचा समाचार घेणारा एक छोटा भाग आहे. १८ ऑगस्ट १९४५ रोजी, तसंच त्याच्या आगे आणि मागे नेमकं काय घडलं याची पुराव्यांनिशी तार्किक संगती लावणारा एक भाग आहे. नेताजींचा तेव्हा मृत्यू झालाच नव्हता असं म्हणणा-यांची भिस्त भारत सरकारकडच्या गोपनीय फाईलींवर फार होती. त्या फायली सरकार खुल्या करीत नव्हते, ही त्यांच्या फायद्याचीच बाब ठरली होती. त्यातून पं. नेहरू विरुद्ध नेताजी असा नसलेला सामना लावणंही सोपं जात होतं. किंबहुना त्या फायलींमध्ये नेहरूंवर टाकण्यासाठी काही चिखल आढळेल याकडे अनेकजण लक्ष लावून बसले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली आणि कोलकत्त्यातील गोपनीय फायलींचे भांडार खुलं केलं आणि सगळ्याच षड्यंत्र सिद्धांतांच्या तोंडाला काळं फासलं गेलं. त्या फायलींतील पुराव्यांनी रे यांच्या संशोधनाला अधिकच बळकटी दिली. नेताजींच्या तोतयांचं बंड ज्या षड्यंत्र सिद्धांतांवर उभं आहे त्यांची, त्यांच्या समर्थनार्थ मांडण्यात आलेल्या कथित पुराव्यांची चिरफाड या पुस्तकातून करण्यात आली आहेच. यादृष्टीने अभ्यासकांसाठी हे पुस्तक मोलाचं ठरतं. परंतु हे पुस्तक तेवढ्यापुरतंच मर्यादीत नाही. हे षड्यंत्र सिद्धांत समाजमनातील ज्या पूर्वग्रहांच्या, ज्या प्रोपगंडाच्या पायांवर उभे आहेत, ज्यातून लोकांच्या मनात संशयाची भूतं जागविण्यात आली आहेत, त्यांचाही लक्ष्यभेद रे यांनी यात केला आहे. पुस्तकातील हा प्रारंभीचा भाग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने त्यातील ‘रिझन डेट्र’हा लेखकाचा उद्देशलेख आणि त्यापुढची दोन प्रकरणं – ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’आणि ‘एनिमी ऑफ द राज’- लक्षणीय ठरतात.

नेताजींच्या प्रतिमेचं पुनर्लेखन सध्या जोरात सुरू आहे. विविध संकेतस्थळांपासून व्हाट्सअँप विद्यापीठापर्यंतच्या अनेक माध्यमांतून ते सुरू आहे. त्याचा मूळ हेतू नीट समजून घेतला पाहिजे. वरवर पाहता ते सारे नेताजींविषयीच्या पूज्यभावातून केलं जातं असं दिसेल. परंतु ते तसं नाही. त्यांना तिथं समग्र नेताजी नकोच आहेत. त्यांना ते हवे आहेत ते फक्त नेहरू आणि गांधी यांची बदनामी करण्यासाठी. त्यासाठी मग निवडक नेताजी उपयोगी पडतात. नेहरू आणि गांधी हे नेताजींचे कट्टर शत्रू ठरवले जातात. गांधींनी नेताजींना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला, कारण त्यांचं नेहरूंवर प्रेम होतं. नेताजी अध्यक्षपदी राहिले असते, तर आपोआपच पंतप्रधान बनले असते. ते गांधींना नको होतं, असा भलताच इतिहास सांगितला जातो. काही वर्षांपूर्वी तर नेहरूंनी नेताजींना युद्धगुन्हेगार म्हटलं होतं, असं सांगणारं एक पत्रच प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ती अर्थातच फोटोशॉपची कमाल होती. या सगळ्यात नेमके नेताजी कसे होते, त्यांचे राजकीय विचार कोणते होते हे बाजूलाच राहतं. रे यांनी ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’या प्रकरणातून ते नीटसपणे समोर आणलं आहे. नेताजींचं चरित्र जाणून घेताना ही बाब नीट लक्षातच घेतली जात नाही, की ते राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव टागोरांच्या बंगालचे सुपूत्र आहेत. तो प्रबोधनाचा वारसा घेऊन ते उभे आहेत. ‘आमचा वैश्विक सहिष्णुतेवरच विश्वास आहे असं नाही, तर सर्व धर्म हे सत्यच आहेत असं आम्ही मानतो,’हे शिकागोतल्या भाषणातलं विवेकानंदांचं वाक्य. त्याचा नेताजींवर प्रभाव आहे. हे सर्व लक्षात घेतलं, की मग कलकत्त्याचे ‘महापौर’असताना पालिकेत सुशिक्षित मुस्लिमांना त्यांच्या संख्येहून अधिक नोक-या राखीव ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही... की सर्व कडवी असलेलं ‘वंदे मातरम्’हे गीत मुस्लिमांच्या भावना दुखावणारं असू शकतं, तेव्हा त्यातील केवळ पहिलंच कडवं निवडावं हा रवींद्रनाथ टागोरांचा सल्ला ते स्वीकारतात तेव्हा त्याचं नवल वाटत नाही. त्या काळातल्या अनेक तरूणांप्रमाणेच तेही डावे, समाजवादाने भारलेले होते. बंगालमधील अनेक क्रांतिकारकांप्रमाणे त्यांचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता. परंतु तरीही ते म. गांधींचे अनुयायी होते. ही बाब अनेकांच्या ध्यानातच येत नाही, की गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते असले, अहिंसा ही त्यांची जीवननिष्ठा असली, तरी काँग्रेसमधील नेहरूंसह अनेक नेते अहिंसेकडे एक राजकीय शस्त्र म्हणूनच पाहात होते. वेळ येताच हाती दुसरं शस्त्र घेण्यास त्यांची ना नव्हती. आणि गांधींची काँग्रेस ही एक प्रकारची वैचारिक मिसळ होती. डावे, उजवे, मधले, अहिंसावादी, क्रांतिकारी असे सर्वच त्या एका छत्राखाली होते. त्यात सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, चक्रवर्ती राजगोपालाचारी, जे. कृपलानी, राजेंद्र प्रसाद यांचा उजवीकडं झुकणारा गट जसा होता, तसाच नेहरू, बोस यांचा डावीकडं झुकलेला किंवा मानवेंद्र रॉय यांचा डावा समाजवादी गटही होता. १९३८मध्ये नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले हे डाव्यांचं यश होतं. नेताजींची अध्यक्षपदी फेरनिवड होऊ नये ही उजव्या गटाची इच्छा होती. त्यावेळी गांधी उजव्या गटाच्या बाजूने होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पट्टाभी सीतारामय्या हे त्यांचे उमेदवार होते. आणि त्यांना पटेल, राजगोपालाचारी आदींचा पाठिंबा होता. पण तो संघर्ष सत्तेचा नव्हता, तर पक्षाचं धोरण काय असावं याबाबतचा होता. नेताजींची आर्थिक धोरणं समाजवादी अंगाने जाणारी होती. त्यांना जमिनदारी पद्धती रद्द करावी, एकूणच जमीन मालकीच्या पद्धतीत सुधारणा करावी, सरकारी मालकीचे आणि नियंत्रणाखालील उद्योगधंदे उभारावेत ही त्यांची मतं होती. युद्धकाळाचा फायदा घेऊन ब्रिटिशांविरोधात उठाव करावा असं त्यांचं म्हणणं होतं. मतभेद त्यावरून होते. त्या निवडणुकीत ते जिंकले. पण नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला, तो सरदार पटेल, राजगोपालाचारी आदींच्या राजकारणामुळे. त्यावेळी नेहरूंनी आपली बाजू घेतली नाही, हे नेताजींचं दुःख होतं. त्यावरून त्यांचे संबंध ताणले गेले. पण ते एवढ्यावरून संपतील इतके वरवरचे नव्हते. १९३५मध्ये नेहरू तुरुंगात असताना परदेशात आजारी कमला नेहरुंच्या देखभालीची जबाबदारी बोस यांनी उचलली होती. कमला नेहरूंच्या निधनसमयी ते त्यांच्यासमवेतच होते. त्यांचं हे मैत्र. १९६०-६१ मध्ये नेताजींची कन्या भारतात आल्यानंतर नेहरूंच्या निवासस्थानातच का उतरते, त्याचं हे कारण आहे. याचा अर्थ नेहरू आणि नेताजी यांच्यात वाद नव्हते असा नाही. नेताजींनी फॅसिस्ट हिटलरचं साह्य घेणं हे नेहरूंना पटणं शक्यच नव्हतं. तेव्हा वाद होतेच, परंतु ते वैचारिक होते, धोरणांविषयीचे होते. त्यांना पंतप्रधानपदाच्या सत्तेची किनार होती असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ते दोघांचीही बदनामी करणारंच ठरतं. रे यांचं हे प्रकरण सातत्याने या गोष्टी अधोरेखीत करीत जातं.

हे पुस्तक नेताजींच्या मृत्यूविषयीचे सर्व षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे कसे आहेत हे सांगतंच, पण त्या सिद्धांतांना आधार देणारे अपप्रचाराचे खांबही या प्रकरणांतून उलथवून टाकतं. नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं. त्या वादावर अखेरचा पडदा टाकतं. आजच्या सत्योत्तरी सत्याच्या काळात म्हणूनच ते मोलाचं ठरतं.

(लेड टू रेस्ट – आशिष रे, प्रकाशक - रोली बुक्स, २०१८, पाने ३१६, मूल्य ५९५ रु.)


००००००००


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतचा आपापला अभ्यासच खरा, असा आग्रह अभ्यासक मांडतात आणि तोही अन्य माहिती महत्त्वाची न मानता. यातून काय गोंधळ होतो, हे दर्शवून देणारा प्रतिक्रियावजा लेख..


फसवे पुस्तक, फसवा लेख

० आनंद हर्डीकर


आशीष रे यांच्या ‘लेड टू रेस्ट’ या पुस्तकाचे रवि आमले यांनी लिहिलेले ‘वादावर पडदा!’ हे पुस्तक परीक्षण (?) गेल्या शनिवारी ‘बुकमार्क’ पानावर वाचले. वरवर पाहता तो लेख म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी ग्रंथाचे परीक्षण आहे,असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तो राष्ट्रीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील विषयावरील फसव्या पुस्तकावरचा तितकाच फसवा परिचयपर नव्हे, तर गौरवलेख आहे. नेताजींसंबंधीच्या माझ्या अलीकडच्या अभ्यासाला ‘सुभाष : एक खोज’ या राजेन्द्र मोहन भटनागर यांच्या पुस्तकाच्या ‘लोकसत्ता’तील प्रदीर्घ पुस्तक परिचयामुळे पुन्हा एकदा चालना मिळाली असल्यामुळे रवि आमले यांचा आणि पर्यायाने आशीष रे यांचाही प्रतिवाद करण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे.

आशीष रे यांनी १९९० च्या ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना दोन पानी पत्र पाठवले होते आणि रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या आहेत, असे मान्य करायला त्यांच्या पत्नी एमिली शेंकेल तयार नाहीत, असे कळवले होते. या पत्राची व त्याला जोडलेल्या चार पानी टिपणाची माहिती आमले यांनी करून घेतलेली नाही आणि नेताजींच्या मृत्यूबद्दल संशोधन करण्यात ३० वर्षे खर्ची घालणाऱ्या रे यांनीदेखील आपल्या पुस्तकात कुठेही ‘त्या’ पत्राची वाच्यता केलेली नाही. नरसिंह रावांपासून नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा नावानिशीवार उल्लेख करणारे आणि त्या सर्वाशी या विषयासंदर्भात आपण सतत विचारविमर्श कसे करीत होतो किंवा त्यांच्या निर्णयांवर भाष्य तरी कसे करीत होतो, याची तपशीलात माहिती देणारे रे व्ही. पी. सिंगांबरोबरच्या या पत्रव्यवहाराबाबत मात्र मौन बाळगून आहेत, हे आमले यांच्या लक्षातच आले नसावे, असे दिसते.

बहुधा राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध असणाऱ्या या सहा पानी दस्ताऐवजाबद्दल आमले यांना माहितीच नसावी; तथापि त्यामुळे रे यांचा या गंभीर समस्येबाबतचा दुटप्पीपणा त्यांच्या लक्षातच आलेला नाही आणि ते या पुस्तकाला विश्वासार्हतेचे अंतिम प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले आहेत.

पूर्वग्रहविरहित मनाने या कूटप्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा एक अभ्यासक या नात्याने मी मात्र ती सहा पानेही अभ्यासली आहेत आणि ‘लेड टू रेस्ट’ हे ताजे पुस्तकही वाचले आहे. आमले यांना वस्तुस्थिती माहिती नाही, हा त्यांचा दोष मानता येणार नाही व त्यामुळे काही प्रमाणात तरी त्यांना सूट मिळू शकेल; पण आशीष रे यांचे काय?

त्या पत्रव्यवहाराबद्दल आपल्या पुस्तकात त्यांनी पाळलेले मौन निव्वळ ‘सोयीस्कर’ म्हणून सोडून देता येण्याजोगे नाही. ते आपमतलबी आहे; हेतुत: लपवाछपवी करणारे आहे.

रेंकोजी मंदिरातील एका कलशामध्ये ठेवलेल्या अस्थी नेताजींच्याच आहेत, असे शाहनवाझ खान यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्य चौकशी समितीतील दोन सदस्यांचे म्हणणे होते. इंदिरा गांधी यांनी नेमलेल्या एकसदस्य चौकशी आयोगानेही तोच निष्कर्ष उचलून धरला होता; तथापि त्यानंतरच्या सुमारे १५ वर्षांत अशा काही गोष्टी पुढे आल्या की,पुन्हा एकदा सरकारतर्फे चौकशी आयोग नेमला जाईल,असे वाटू लागले होते. तो धागा पकडून रे यांनी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना पत्र पाठवले होते. ‘एमिली शेंकेल यांच्याशी आपले बोलणे झाले असून टोकियोच्या रेंकोजी मंदिरातील अस्थिकलशात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या असाव्यात असे त्यांना वाटत नाही. त्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात, असेही त्यांना वाटत नाही,’ हे रे यांनी या पत्रात प्रारंभीच्या चार परिच्छेदांत नमूद केले होते. नंतरच्या परिच्छेदात ‘आपण नेताजींचे थोरले बंधू शरच्चंद्र बोस यांचे नातू असलो, तरी या विषयाचा खुल्या मनाने व अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला’ असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘१९४५ साली कथित विमान अपघातात सुभाषबाबू मरण पावलेच नाहीत असे ठामपणे म्हणता येत नाही, असे आपले मत बनले असून ते अजूनही जिवंत आहेत असे सूचित करणाऱ्यांचे म्हणणे आपण साफ अमान्य करतो,’ असा खुलासा त्यांनी केला होता.

नवा आयोग नेमण्याच्या फंदात पडण्यापेक्षा एखाद्या जाणकार माणसाकडे सर्व नव्या-जुन्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णायक अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवणे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर ठरेल,असा सल्ला रे यांनी त्या पत्राद्वारे व्ही. पी. सिंग यांना दिला होता आणि ‘त्या’ विमान अपघातात नेताजी मरण पावले, असा दावा करणाऱ्या पुराव्यांमधील अंतर्गत विसंगती व परस्परविरोध दाखवून देणारे टिपण त्या पत्राला जोडले होते. हेतू अर्थातच तशी जबाबदारी आपल्याकडे यावी, असे सुचवण्याचा होता.

तर, मुद्दा हा की, रे यांनी आपली ऑगस्ट, १९९० मधील ‘ती’ भूमिका या पुस्तकात दडवून का ठेवली आहे? रे हे प्रामाणिकपणाने या विषयाचा सोक्षमोक्ष लावू इच्छित होते, तर मग पारदर्शक पद्धतीने आधीची भूमिका का बदलली, नवे कोणते पुरावे शोधून काढले, हे त्यांनी सप्रमाण दाखवून द्यायला हवे होते आणि तशा विवेचनाच्या ओघात, आमले यांनी ज्या षड्यंत्र सिद्धांतांचा ‘रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगे’ अशा हेटाळणीच्या शब्दांत उल्लेख केला आहे, ते सिद्धान्त थोडक्यात मांडून त्यांचे खंडन करायला हवे होते.

नेताजी १९४५ साली ऑगस्टमध्ये मांचुरियामार्गे सोव्हिएत युनियनला गेले. पुढे ते तिकडे तुरुंगात होते, वगैरे मांडणी करणारा सिद्धान्त पूर्वीपासूनच फेटाळला जात होता. त्याला पुन्हा चालना मिळाली ती १९९४ च्या मे ते सप्टेंबर महिन्यांत मॉस्कोच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय अभ्यासकांच्या गटातील पूरबी रॉय या रशियन भाषेच्या जाणकार सदस्यांना योगायोगाने गवसलेल्या नेताजींबद्दलच्या ताज्या सोव्हिएत लेखांमुळे! कोलकात्याच्या ‘एशियाटिक सोसायटी’तर्फे १९१७ ते १९४७ या कालखंडातील भारतीय क्रांतिकारकांच्या सोव्हिएत युनियनशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी त्या तिकडे गेल्या होत्या. त्यासंबंधीची कागदपत्रे न्याहाळताना त्यांना अनपेक्षितपणे नेताजी १९४५ नंतरही हयात असल्याचे दर्शविणारे उल्लेख सापडत गेले. तशी असंख्य कागदपत्रे पुढील काळात त्यांनी देशोदेशींच्या अभिलेखागारांतून मिळवली. त्यातील प्रमुख कागदपत्रांचा धांडोळा घेऊन ‘द सर्च फॉर नेताजी : न्यू फाइंडिंग्ज’ हे पुस्तक लिहिले (प्रकाशक : पर्पल पीकॉक बुक्स अ‍ॅण्ड आर्ट्स प्रा. लि., २०११). त्याआधीही रॉय यांनी दिल्ली-कोलकात्यातील मान्यवर अभ्यासक-पत्रकारांच्या मेळाव्यात ही कागदपत्रे (या कागदपत्रांचे वजन ४० किलो भरले होते!) मांडली होती व याविषयी जनजागृती करण्याचे आपल्या परीने प्रयत्नही केले होते. मुखर्जी आयोगासमोरची त्यांची साक्षही लक्षवेधी ठरली होती.

पूरबी रॉय यांचा, त्यांच्या या पुस्तकाचा,पुस्तकात उल्लेखिलेल्या आणि अनुवादित करूनही दिलेल्या कागदपत्रांचा तर्कशुद्ध प्रतिवाद रे यांनी आपल्या पुस्तकात करणे योग्य ठरले असते. मात्र प्रतिवाद सोडाच, त्यांनी रॉय यांची साधी दखलही घेतलेली नाही. नेताजींच्या मृत्यूभोवतीचे गूढ उकलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या रे यांनी पूरबी रॉय यांच्याशी संपर्कच साधलेला दिसत नाही आणि तरीही आमले तो षड्यंत्र सिद्धान्त(?) ‘रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगा’ कसा आहे, हे रे यांच्या या पुस्तकात दाखवून देण्यात आले आहे, एवढेच नव्हे, तर ‘अपप्रचाराचे खांब उलथवून टाकणारी मांडणी त्यात आली आहे’ असे प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले आहेत!

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे १६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादला मरण पावलेले कुणी एक गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हे नेताजीच होते, असा दावा म्हणा किंवा आमले यांच्या परिभाषेत ‘षड्यंत्र सिद्धान्त’ म्हणा, गेली कित्येक वर्षे चर्चिला जातो आहे. अशोक टंडन यांच्या ‘नये लोग’ या हिंदी वृत्तपत्रातील १७ लेखांकापासून ‘हिंदुस्तान टाइम्स’तर्फे वीर संघवी- अनुज धर प्रभृती पत्रकारांनी दोन वर्षे चालवलेल्या शोधमोहिमेपर्यंत असंख्य पत्रकारांनी हा ‘षड्यंत्र सिद्धान्त’ उचलून धरण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणी दोन याचिकांची एकत्रित सुनावणी करून २०१३ साली उत्तर प्रदेश सरकारला बहुविध आदेश दिले. अखिलेश यादव यांच्या सरकारने २०१६ साली नाइलाजाने त्यातल्या काहींची तोंडदेखली अंमलबजावणीसुद्धा केली. हा संपूर्ण ‘षड्यंत्र सिद्धान्त’रे यांनी विचारातच घेतलेला नाही. त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याच सुमारास अधीर सोम या लखनौनिवासी तर्कशास्त्र्याने लिहिलेले ‘गुमनामी बाबा : अ केस हिस्ट्री’ (प्रकाशक : ईबीसी) हे पुस्तकही प्रसिद्ध झाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या १८ फेब्रुवारी २०१८ च्या अंकात या दोन्ही पुस्तकांचा परिचय प्रसिद्ध झाला आहे. रे यांना अधीर सोम यांचे पुस्तक उपलब्ध झाले नसणार हे स्पष्ट आहे, तथापि अधीरजींच्या पुस्तकात एका प्रकरणाच्या स्वरूपात छापलेले उच्च न्यायालयाचे निकालपत्र तर त्यांनी अभ्यासायलाच हवे होते. पुढील आनुषंगिक प्रवास, प्रत्यक्ष फैजाबादला भेट वगैरे प्रकारही त्यांनी करायलाच हवे होते. तसे काहीही न करताच त्यांनी आपल्या पुस्तकाला ‘लेड टू रेस्ट – द कॉण्ट्रोव्हर्सी ओव्हर सुभाषचंद्र बोस’स डेथ’ असे शीर्षक देण्याचा विचार केलाच कसा? आणि नेताजींच्या कन्या अनिता पाफ यांनी रे यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदात ‘जर शक्य असेल तर रेंकोजी मंदिरातील अस्थींची डीएनए चाचणी घेतली जावी म्हणजे उरलेसुरले संशय दूर होतील,’ असे म्हणून मारलेली महत्त्वाची मेख आमले यांच्या नजरेतून सुटली तरी कशी?

गुमनामी बाबा प्रकरणाचा शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध सोक्षमोक्ष लागल्याशिवाय हे गूढ पूर्णपणे उकलणारच नाही, हे आमले यांनी ओळखायला हवे होते. तसे त्यांनी केले असते तर रे यांच्या पुस्तकाला असे अंतिम निर्णायक प्रमाणपत्र देण्याची धाडसी व अभिनिवेशी घाई त्यांनी केलीच नसती. रे यांच्या पुस्तकात नवे कोणते पुरावे सादर करण्यात आले आहेत,याचे विवेचन न करताच षड्यंत्र सिद्धान्त मांडत राहिलेल्या एकाही अभ्यासकाचे म्हणणे पूर्वपक्ष म्हणून वाचकांसमोर ठेवण्याचे साधे टीकासूत्र दुर्लक्षित करून सरसकट सर्वावर नेहरू-गांधीद्वेषाचे हेत्वारोप करणे त्यांनी टाळले असते.




००००००००



नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूप्रकरणावरील गूढाचा पडदा दूर करण्याचे सर्वच प्रयत्न वादग्रस्त ठरताना दिसतात. ते वाद राजकारणात आजही लागू असलेल्या धारणांशी निगडित असतात. आशीष रे यांचे ‘लेड टू रेस्ट’ हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. या पुस्तकाच्या ‘वादावर पडदा!’ (१४ एप्रिल) या परीक्षणलेखावरील आनंद हर्डीकर लिखित ‘फसवे पुस्तक, फसवा लेख’ (२१ एप्रिल) या प्रतिक्रियात्मक लेखाचा हा प्रतिवाद..

तोतयांचे बंड मोडताना..

० रवि आमले


आशीष रे यांचे ‘लेड टू रेस्ट’ हे पुस्तक फसवे आहे. त्यावरील रवि आमले यांचा ‘वादावर पडदा!’ हा परिचयलेख नव्हे, तर ‘गौरवलेख’ फसवा आहे...
- नेताजींसंबंधी पूर्वीपासून अभ्यास करणारे आणि आता दुसऱ्या एका पुस्तकाच्या परिचयलेखामुळे त्या अभ्यासाला पुन्हा चालना ज्यांना मिळाली ते रा. आनंद हर्डीकर यांचे हे मत. व्हॉटस्अॅप विद्यापीठातील इतिहास पदवीधरांनी असे मत मांडले असते, तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. रा. हर्डीकर हे गंभीर अभ्यासक आहेत. शिवाय त्यांनी राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध असलेला आशीष रे व व्ही. पी. सिंग यांच्यातील पत्रव्यवहाराचा ‘सहा पानी दस्तावेज’ही अभ्यासला आहे व ‘पूर्वग्रहविरहित मनाने’ या कूटप्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा त्यांनी केलेला प्रतिवाद गांभीर्यानेच घ्यावा लागेल. या लेखातून त्यांनी काही आरोपवजा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील पहिला प्रश्न असा की, रे यांनी ऑगस्ट, १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना पाठविलेल्या पत्राबाबत मौन का बाळगले?

काय होती रे यांच्या त्या पत्रातील भूमिका? तर त्यांना १९९० मध्ये असे वाटत होते की, नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालेला नाही. त्या अपघाताबाबतच्या पुराव्यांतील अंतर्गत विसंगती, परस्परविरोध लक्षात घेऊन त्यांचे तसे मत झाले होते. तसे त्यांनी सरकारला कळविले होते. याबाबत रा. हर्डीकर यांचा आरोप असा की- ही माहिती रे यांनी ‘आपमतलबी’पणे आणि ‘लपवाछपवी’च्या हेतूने दडवली. तो रे यांचा दुटप्पीपणा होता आणि हे रवि आमले यांच्या लक्षातच आले नाही. वस्तुत: ते पत्र शोधण्यासाठी राष्ट्रीय अभिलेखागारापर्यंतही जाण्याची आवश्यकता नाही. त्याचा उल्लेख अनुज धर यांच्या ‘इंडियाज् बिगेस्ट कव्हर-अप’ या पुस्तकातही येतो. पण प्रश्न आमलेंना ती माहिती असण्या-नसण्याचा नाहीच. प्रश्न रे यांनी त्याबाबत मौन बाळगून दुटप्पीपणा केला की काय, हा आहे. आता समोर असणारे पुरावे, त्यांचे विश्लेषण, अभ्यास यातून एखाद्याने आपले आधीचे मत बदलले, तर त्यास दुटप्पीपणा म्हणावे ही इतिहासाच्या शास्त्रातील नवी पद्धत आहे की काय, याची कल्पना नाही. परंतु ‘१९९५ पर्यंत’ रे यांचे पूर्वीचे मत बदलले होते. नेताजींचा मृत्यू अपघातातच झाला असल्याचे ‘पुरेसे नि:संदिग्ध पुरावे’ आपणासमोर आले होते, असे रे यांनी या पुस्तकातच म्हणून ठेवले आहे. यावर रा. हर्डीकर यांचा सवाल आहेच, की त्यांनी (पक्षी- रे यांनी) कोणते नवे पुरावे शोधून काढले हे सप्रमाण दाखवून द्यायला हवे होते. आता २०१५-१६ मध्ये केंद्र आणि प. बंगाल सरकारने त्यांच्याकडील गोपनीय फायली खुल्या केल्या. नेताजी १९४५ नंतर रशियात गेले, तेथे स्टॅलिनने त्यांना अटकेत ठेवले, असा प्रवाद होता. ज्येष्ठ संपादक दिवंगत गोविंदराव तळवलकर हे नेताजींबाबत संशोधन करीत होते. त्यांनी त्याबाबत रशियाकडे विचारणा केली असता, नेताजींना रशियात कोणत्याही तुरुंगात ठेवले नसल्याचा स्पष्ट निर्वाळा रशियन स्टेट अर्काइव्हकडून देण्यात आला. ती पत्रे १३ जुलै आणि १३ नोव्हेंबर २०१५ ची. या सगळ्याच्या अभ्यासातून, स्वत: केलेल्या संशोधनातून रे यांनी बोस यांच्याविषयीच्या षड्यंत्र सिद्धांतांना विराम देण्याचा जो प्रयत्न केला आहे,त्यातूनच तर त्यांचे पुस्तक उभे राहिले आहे.

मात्र रा. हर्डीकरांसाठी ते पुरेसे नसावे. त्यांचे म्हणणे एकच की, डॉ. पूरबी रॉय यांच्या पुस्तकाचा तर्कशुद्ध प्रतिवाद कुठे रे यांनी केलाय? मग ‘तो (म्हणजे नेताजी १९४५ नंतर रशियात होते हा) षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगा असल्याचे’ रे यांनी दाखवून दिले आहे, असे आमले कसे म्हणतात? तर ते असे म्हणतात, याचे कारण एक तर ‘कॉक अ‍ॅण्ड बुल स्टोरीज्’ या प्रकरणात तो षड्यंत्र सिद्धांतच असल्याचे रे यांनी म्हटले आहे. रशियाकडून आलेल्या अधिकृत उत्तरांनी तो प्रश्न संपविला असून, त्यावर २०१६ मध्ये जाहीर झालेल्या गोपनीय फायलींनी शिक्कामोर्तब केले आहे, असे रे सांगत आहेत. आता रे यांची ती मांडणी तर्कशुद्ध नाही असे रा. हर्डीकरांना ते पुस्तक वाचूनही वाटत असेल, तर त्यास कोण काय करणार?

परंतु रा. हर्डीकर एवढय़ावरच थांबत नाहीत. रे यांनी काय काय करायला हवे होते याचा सल्ला देताना, ते ‘गुमनामीबाबा प्रकरणा’कडे वळतात आणि म्हणतात, की गुमनामीबाबा हे नेताजीच असल्याचा दावा एवढी वर्षे केला जात आहे. पण हा संपूर्ण ‘षड्यंत्र सिद्धांत’ रे यांनी विचारातच घेतलेला नाही. वस्तुत: त्याची सविस्तर दखल रे यांनी घेतलेली आहे. हे गुमनामीबाबा म्हणजे कृष्णदत्त उपाध्याय ऊर्फ कप्तानबाबा होते व ते एका खून प्रकरणात पसार झाले होते, असे सांगणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. रे यांनी त्याचाही उल्लेख केला आहे. रा. हर्डीकर यांच्याकडील पुस्तकाच्या प्रतीतून कदाचित ती पाने गहाळ असतील. अन्यथा त्यांनी असा दावा का बरे केला असता? असो.

या प्रतिवादलेखाचा शेवट करताना रा. हर्डीकर यांनी, आमले यांनी या पुस्तकाला अंतिम निर्णायक प्रमाणपत्र देण्याची धाडसी व अभिनिवेशी घाई केली असल्याचे म्हटले आहे. धाडस का? तर अद्याप गुमनामीबाबाचे गूढ उकलले नाही म्हणून! बरोबरच आहे. ते उकलायलाच हवे. पण उकलले तरी, ‘गुमनामीबाबा हेच नेताजी’ ही ज्यांची श्रद्धा आहे किंवा त्या श्रद्धेवर ज्यांचे स्वार्थ उभे आहेत ते त्यावर विश्वास ठेवतील? किमान पेशवाईतील तोतयांच्या बंडांचा इतिहास ज्यांना माहीत आहे ते तरी तसे समजण्याचे धाडस करणार नाहीत. गुमनामीबाबाबद्दल तर एक साधा प्रश्न आहे. नेताजी हे एवढे मोठे नेते होते की, त्यांना भारतात येण्यापासून देशातील कोणतीही शक्ती अडवू शकली नसती. तरीही नेताजी भारतात येऊन गुमनाम बनून का राहिले? त्यांचे देशावर प्रेम नव्हते? बरे संन्यास घेऊन एकदा गुमनाम राहायचे ठरविल्यानंतर ते कुणाला रशियातल्या गोष्टी का सांगत बसले असते? किंवा मग त्यांच्या सामानात चार्ल्स बर्लिट्झचे ‘द बम्र्युडा ट्रँगल’, जॉर्ज अॅडम्स्कीचे ‘फ्लाइंग सॉसर्स फेअरवेल’ वा आय. जी. बर्नहॅमचे ‘सेलिब्रेटेड क्राइम्स’ अशी पुस्तके का सापडली असती? अशा प्रश्नांना उत्तरे नाहीत आणि तरीही अगदी नेताजींचे काही नातेवाईक गुमनामीबाबालाच नेताजी समजून चालले आहेत. अर्थात, आशीष रे हेही नेताजींचेच नातेवाईक. ते मात्र तोतयांची बंडे मोडून काढत आहेत. त्याचबरोबर नेताजींच्या प्रतिमेचे पुनर्लेखन करण्याचे प्रयत्नही ते उधळवून लावू पाहात आहेत.

आजच्या - म्हणजे ‘नेताजी विरुद्ध नेहरू’ असा सामना लढवून, पंडित नेहरूंना त्यात खलनायक ठरविण्याचा उद्योग लोकप्रिय असल्याच्या – काळात नेताजींच्या मृत्यूविषयीचे षड्यंत्र सिद्धांत काय आहेत व त्यांची वासलात रे यांनी कशी लावली हे सांगणे आवश्यक खरे, परंतु त्याहून महत्त्वाचे होते हे षड्यंत्र सिद्धांत समाजमनातील ज्या पूर्वग्रहांच्या, प्रोपगंडाच्या पायांवर उभे आहेत, ज्यातून व ज्यासाठी लोकांच्या मनात संशयाची भूतं जागविण्यात आली आहेत, त्यांचा लक्ष्यभेद रे यांनी कसा केला हे सांगणे. असा लक्ष्यभेद करणे ही रे यांच्या पुस्तकलेखनामागील एक प्रेरणा असल्याचे सतत जाणवत राहते. त्याबाबतचा परिचयलेख लिहिताना बाकीचे काय नजरेत आले नाही, यापेक्षा ती प्रेरणा नजरेआड झाली नाही ना हे पाहणे महत्त्वाचे होते. ते नीट पाहिले गेले हे आता समजते आहे.