Netaji Files

नेताजींच्या पुस्तकाचा वाद


निवेदन -
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या गुढाबद्दले माझे आकर्षण जुनेच. किमान १५ वर्षे त्याबद्दल मिळेल ते मी वाचत आहे. अनुज धर यांचे लेख आणि पुस्तके हा त्या वाचनाचाच एक भाग होता. मोदी सरकारने नेताजींबद्दलच्या गोपनीय फाईली हो ना करता अखेर खुल्या केल्या. त्यातील अनेक कागदपत्रेही मी वाचली. त्यातून लक्षात येऊ लागले की हे गूढ म्हणजे केवळ कॉन्स्पिरसी थेअरी - षड्‌यंत्र सिद्धांत - आहे. त्यातूनच मग लोकसत्ता दिवाळी अंकासाठी मी एक दीर्घलेख लिहिला. त्याला बराच काळ लोटला. उलट्यासुलट्या अनेक प्रतिक्रिया आल्या त्यावर. तशातच पुन्हा माझ्या हाती लागले ते आशीष रे यांचे नेताजींच्या मृत्यूरहस्याविषयीचे पुस्तक. लेड टू रेस्ट. त्याचा परिचय मी लोकसत्ताच्या बुकमार्क पानातून करून दिला. अनेकांना तो आवडला. काहींना नावडला.  ज्येष्ठ पत्रकार आणि पुस्तक संपादक श्री. आनंद हर्डीकर यांनी त्या लेखाला झोडून काढणारा लेख लिहिला. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि फीचर्स संपादक अभिजीत ताम्हणे यांनी तो लोकसत्ताच्या भूमिकेनुसार छापला. आता त्या लेखाला प्रत्युत्तर देणे भागच होते. ते मी दिलेही. श्री. हर्डीकर यांनी त्याचा प्रतिवाद न केल्यामुळे तो छापील वाद तेथेच संपला. ते हे लेख. त्यातील पहिल्या लेखाचा मथळा होता - वादावर पडदा. ही एक गंमतच म्हणायची....

०००००


वादावर पडदा!

० रवि आमले

सत्याला कधी मरण नसतं म्हणतात. नसेलही. आजच्या बनावट बातम्या आणि अपमाहितीच्या काळात त्याबाबत खात्रीनं काही बोलणं कठीणच. पण एक बाब नक्की सांगता येते, की सत्याला मरण नसले, तरी त्याला काळकोठडी नक्की असते. काही सत्यं तिथंच कायमची खितपत पडतात. क्वचितच काहींना सूर्यप्रकाश दिसतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युविषयीच्या सत्याचं असंच. १८ ऑगस्ट १९४५ ला त्यांचा मृत्यू झाला की नाही?ते विमान अपघातात गेले की अन्य कुठं त्यांचं देहावसान झालं?आजवर हे सत्य असंच अंधारात पडून होतं. बाहेर जे मिरवले जात होते ते होते षड्यंत्र सिद्धांत.

१९४९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री या नात्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. पण लोकांच्या मनातील नेताजींची प्रतिमा त्यांना त्या कटू सत्यावर विश्वास ठेवू देत नव्हती. या लोकांमध्येही दोन प्रकार होते. काही खरोखरच भाबडे होते आणि काही राजकारणी होते. नेताजींच्या मृत्यूबाबतचं गूढ जागतं ठेवण्यामागील त्यांचे हेतू वेगवेगळे होते. नेताजींचे बंधु सुरेशचंद्र बोस, कट्टर अनुयायी एच. व्ही. कामथ यांच्यासारख्यांचा नेताजी हयात असण्यावरचा विश्वास वेगळा होता. ते आशेवर जगत होते आणि त्या आशेला मिळतील त्या ख-या-खोट्या माहितीचे टेकू देत होते. बाकीच्या मंडळींचे हेतू तेवढे सरळ नव्हते. त्यांना वैयक्तिक हेवेदाव्यांची किनार होती. पं. बंगालमधील शालमारीबाबा म्हणजे नेताजी असं सांगणा-यांचे हेतू तर स्पष्टच फसवणुकीचे होते. अनेकांसाठी नेताजींच्या मृत्यूचं गूढ हे सत्ताकारणातलं शस्त्र बनलं होतं. आजही ते अधुनमधून, सहसा निवडणुकांच्या तोंडावर उपसलं जातं. या पार्श्वभूमीवर आशिष रे यांचं ‘लेड टू रेस्ट’हे ताजं पुस्तक महत्त्वाचं ठरतं.

काय लिहिलंय यापेक्षा कोणी लिहिलंय यावरून लिखाण जोखण्याची आपल्याकडची रीत आहे. विचारांवर हल्ले करायचे तर त्यासाठी विचार घेऊनच मैदानात उतरावं लागतं. त्यापेक्षा व्यक्तिगत शिविगाळ केली की काम भागतं. आपल्याकडील वैचारिक वादाची पद्धत असल्यानं हे सांगायला हवं, की आशिष रे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. बीबीसी, सीएनएन पासून आनंद बझार पत्रिका, टाइम्स ऑफ इंडिया अशा विविध वृत्तपत्रसमूहांसाठी त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ परराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. नेताजी हा त्यांच्या कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ३० वर्षांच्या संशोधनाची फलश्रुती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना. जर्मन अर्थशास्त्रज्ञ प्रो. डॉ. अनिता पाफ यांनी ती लिहिलीय. नेताजी ऑगस्ट १९४५ नंतरही हयात होते असे मानणा-यांच्या हेतूंबाबत सहानुभूती ठेवून त्या सांगतात, की १८ ऑगस्ट १९४५ रोजी फार्मोसातल्या (आताचं तैवान) तैहोकू विमानतळावर झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला हीच आजवरच्या सर्व पुराव्यांतून समोर आलेली सुसंगत गोष्ट आहे. त्याही पुढे जाऊन त्या सांगतात, की इतिहाकार आणि नेताजींचे चरित्रकार प्रो. लिओनार्ड गॉर्डन यांनी त्या अपघातातून बचावलेल्या एका जपानी सैनिकाची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्या स्वतः तिथं होत्या. त्या सांगतात, की त्या मुलाखतीनं नेताजींच्या मृत्यूचं वास्तव लख्खपणे त्यांच्यासमोर उभं केलं. नेताजींवर हक्क सांगणा-या लोकांसाठी हे सांगायलाच हवं, की डॉ. अनिता पाफ या नेताजींच्या एकुलत्या एक कन्या आहेत.

रे यांच्या या संशोधनपर पुस्तकाचे आपापतः काही विभाग पडतात. त्यात नेताजींच्या मृत्यूबाबत उठवलेल्या वावड्या, त्यांचे तोतये, तत्कालिन गुप्तचर संस्थांनी घातलेले घोळ यांचा समाचार घेणारा एक छोटा भाग आहे. १८ ऑगस्ट १९४५ रोजी, तसंच त्याच्या आगे आणि मागे नेमकं काय घडलं याची पुराव्यांनिशी तार्किक संगती लावणारा एक भाग आहे. नेताजींचा तेव्हा मृत्यू झालाच नव्हता असं म्हणणा-यांची भिस्त भारत सरकारकडच्या गोपनीय फाईलींवर फार होती. त्या फायली सरकार खुल्या करीत नव्हते, ही त्यांच्या फायद्याचीच बाब ठरली होती. त्यातून पं. नेहरू विरुद्ध नेताजी असा नसलेला सामना लावणंही सोपं जात होतं. किंबहुना त्या फायलींमध्ये नेहरूंवर टाकण्यासाठी काही चिखल आढळेल याकडे अनेकजण लक्ष लावून बसले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली आणि कोलकत्त्यातील गोपनीय फायलींचे भांडार खुलं केलं आणि सगळ्याच षड्यंत्र सिद्धांतांच्या तोंडाला काळं फासलं गेलं. त्या फायलींतील पुराव्यांनी रे यांच्या संशोधनाला अधिकच बळकटी दिली. नेताजींच्या तोतयांचं बंड ज्या षड्यंत्र सिद्धांतांवर उभं आहे त्यांची, त्यांच्या समर्थनार्थ मांडण्यात आलेल्या कथित पुराव्यांची चिरफाड या पुस्तकातून करण्यात आली आहेच. यादृष्टीने अभ्यासकांसाठी हे पुस्तक मोलाचं ठरतं. परंतु हे पुस्तक तेवढ्यापुरतंच मर्यादीत नाही. हे षड्यंत्र सिद्धांत समाजमनातील ज्या पूर्वग्रहांच्या, ज्या प्रोपगंडाच्या पायांवर उभे आहेत, ज्यातून लोकांच्या मनात संशयाची भूतं जागविण्यात आली आहेत, त्यांचाही लक्ष्यभेद रे यांनी यात केला आहे. पुस्तकातील हा प्रारंभीचा भाग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने त्यातील ‘रिझन डेट्र’हा लेखकाचा उद्देशलेख आणि त्यापुढची दोन प्रकरणं – ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’आणि ‘एनिमी ऑफ द राज’- लक्षणीय ठरतात.

नेताजींच्या प्रतिमेचं पुनर्लेखन सध्या जोरात सुरू आहे. विविध संकेतस्थळांपासून व्हाट्सअँप विद्यापीठापर्यंतच्या अनेक माध्यमांतून ते सुरू आहे. त्याचा मूळ हेतू नीट समजून घेतला पाहिजे. वरवर पाहता ते सारे नेताजींविषयीच्या पूज्यभावातून केलं जातं असं दिसेल. परंतु ते तसं नाही. त्यांना तिथं समग्र नेताजी नकोच आहेत. त्यांना ते हवे आहेत ते फक्त नेहरू आणि गांधी यांची बदनामी करण्यासाठी. त्यासाठी मग निवडक नेताजी उपयोगी पडतात. नेहरू आणि गांधी हे नेताजींचे कट्टर शत्रू ठरवले जातात. गांधींनी नेताजींना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला, कारण त्यांचं नेहरूंवर प्रेम होतं. नेताजी अध्यक्षपदी राहिले असते, तर आपोआपच पंतप्रधान बनले असते. ते गांधींना नको होतं, असा भलताच इतिहास सांगितला जातो. काही वर्षांपूर्वी तर नेहरूंनी नेताजींना युद्धगुन्हेगार म्हटलं होतं, असं सांगणारं एक पत्रच प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ती अर्थातच फोटोशॉपची कमाल होती. या सगळ्यात नेमके नेताजी कसे होते, त्यांचे राजकीय विचार कोणते होते हे बाजूलाच राहतं. रे यांनी ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’या प्रकरणातून ते नीटसपणे समोर आणलं आहे. नेताजींचं चरित्र जाणून घेताना ही बाब नीट लक्षातच घेतली जात नाही, की ते राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव टागोरांच्या बंगालचे सुपूत्र आहेत. तो प्रबोधनाचा वारसा घेऊन ते उभे आहेत. ‘आमचा वैश्विक सहिष्णुतेवरच विश्वास आहे असं नाही, तर सर्व धर्म हे सत्यच आहेत असं आम्ही मानतो,’हे शिकागोतल्या भाषणातलं विवेकानंदांचं वाक्य. त्याचा नेताजींवर प्रभाव आहे. हे सर्व लक्षात घेतलं, की मग कलकत्त्याचे ‘महापौर’असताना पालिकेत सुशिक्षित मुस्लिमांना त्यांच्या संख्येहून अधिक नोक-या राखीव ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही... की सर्व कडवी असलेलं ‘वंदे मातरम्’हे गीत मुस्लिमांच्या भावना दुखावणारं असू शकतं, तेव्हा त्यातील केवळ पहिलंच कडवं निवडावं हा रवींद्रनाथ टागोरांचा सल्ला ते स्वीकारतात तेव्हा त्याचं नवल वाटत नाही. त्या काळातल्या अनेक तरूणांप्रमाणेच तेही डावे, समाजवादाने भारलेले होते. बंगालमधील अनेक क्रांतिकारकांप्रमाणे त्यांचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता. परंतु तरीही ते म. गांधींचे अनुयायी होते. ही बाब अनेकांच्या ध्यानातच येत नाही, की गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते असले, अहिंसा ही त्यांची जीवननिष्ठा असली, तरी काँग्रेसमधील नेहरूंसह अनेक नेते अहिंसेकडे एक राजकीय शस्त्र म्हणूनच पाहात होते. वेळ येताच हाती दुसरं शस्त्र घेण्यास त्यांची ना नव्हती. आणि गांधींची काँग्रेस ही एक प्रकारची वैचारिक मिसळ होती. डावे, उजवे, मधले, अहिंसावादी, क्रांतिकारी असे सर्वच त्या एका छत्राखाली होते. त्यात सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, चक्रवर्ती राजगोपालाचारी, जे. कृपलानी, राजेंद्र प्रसाद यांचा उजवीकडं झुकणारा गट जसा होता, तसाच नेहरू, बोस यांचा डावीकडं झुकलेला किंवा मानवेंद्र रॉय यांचा डावा समाजवादी गटही होता. १९३८मध्ये नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले हे डाव्यांचं यश होतं. नेताजींची अध्यक्षपदी फेरनिवड होऊ नये ही उजव्या गटाची इच्छा होती. त्यावेळी गांधी उजव्या गटाच्या बाजूने होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पट्टाभी सीतारामय्या हे त्यांचे उमेदवार होते. आणि त्यांना पटेल, राजगोपालाचारी आदींचा पाठिंबा होता. पण तो संघर्ष सत्तेचा नव्हता, तर पक्षाचं धोरण काय असावं याबाबतचा होता. नेताजींची आर्थिक धोरणं समाजवादी अंगाने जाणारी होती. त्यांना जमिनदारी पद्धती रद्द करावी, एकूणच जमीन मालकीच्या पद्धतीत सुधारणा करावी, सरकारी मालकीचे आणि नियंत्रणाखालील उद्योगधंदे उभारावेत ही त्यांची मतं होती. युद्धकाळाचा फायदा घेऊन ब्रिटिशांविरोधात उठाव करावा असं त्यांचं म्हणणं होतं. मतभेद त्यावरून होते. त्या निवडणुकीत ते जिंकले. पण नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला, तो सरदार पटेल, राजगोपालाचारी आदींच्या राजकारणामुळे. त्यावेळी नेहरूंनी आपली बाजू घेतली नाही, हे नेताजींचं दुःख होतं. त्यावरून त्यांचे संबंध ताणले गेले. पण ते एवढ्यावरून संपतील इतके वरवरचे नव्हते. १९३५मध्ये नेहरू तुरुंगात असताना परदेशात आजारी कमला नेहरुंच्या देखभालीची जबाबदारी बोस यांनी उचलली होती. कमला नेहरूंच्या निधनसमयी ते त्यांच्यासमवेतच होते. त्यांचं हे मैत्र. १९६०-६१ मध्ये नेताजींची कन्या भारतात आल्यानंतर नेहरूंच्या निवासस्थानातच का उतरते, त्याचं हे कारण आहे. याचा अर्थ नेहरू आणि नेताजी यांच्यात वाद नव्हते असा नाही. नेताजींनी फॅसिस्ट हिटलरचं साह्य घेणं हे नेहरूंना पटणं शक्यच नव्हतं. तेव्हा वाद होतेच, परंतु ते वैचारिक होते, धोरणांविषयीचे होते. त्यांना पंतप्रधानपदाच्या सत्तेची किनार होती असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ते दोघांचीही बदनामी करणारंच ठरतं. रे यांचं हे प्रकरण सातत्याने या गोष्टी अधोरेखीत करीत जातं.

हे पुस्तक नेताजींच्या मृत्यूविषयीचे सर्व षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे कसे आहेत हे सांगतंच, पण त्या सिद्धांतांना आधार देणारे अपप्रचाराचे खांबही या प्रकरणांतून उलथवून टाकतं. नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं. त्या वादावर अखेरचा पडदा टाकतं. आजच्या सत्योत्तरी सत्याच्या काळात म्हणूनच ते मोलाचं ठरतं.

(लेड टू रेस्ट – आशिष रे, प्रकाशक - रोली बुक्स, २०१८, पाने ३१६, मूल्य ५९५ रु.)


००००००००


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतचा आपापला अभ्यासच खरा, असा आग्रह अभ्यासक मांडतात आणि तोही अन्य माहिती महत्त्वाची न मानता. यातून काय गोंधळ होतो, हे दर्शवून देणारा प्रतिक्रियावजा लेख..


फसवे पुस्तक, फसवा लेख

० आनंद हर्डीकर


आशीष रे यांच्या ‘लेड टू रेस्ट’ या पुस्तकाचे रवि आमले यांनी लिहिलेले ‘वादावर पडदा!’ हे पुस्तक परीक्षण (?) गेल्या शनिवारी ‘बुकमार्क’ पानावर वाचले. वरवर पाहता तो लेख म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी ग्रंथाचे परीक्षण आहे,असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तो राष्ट्रीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील विषयावरील फसव्या पुस्तकावरचा तितकाच फसवा परिचयपर नव्हे, तर गौरवलेख आहे. नेताजींसंबंधीच्या माझ्या अलीकडच्या अभ्यासाला ‘सुभाष : एक खोज’ या राजेन्द्र मोहन भटनागर यांच्या पुस्तकाच्या ‘लोकसत्ता’तील प्रदीर्घ पुस्तक परिचयामुळे पुन्हा एकदा चालना मिळाली असल्यामुळे रवि आमले यांचा आणि पर्यायाने आशीष रे यांचाही प्रतिवाद करण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे.

आशीष रे यांनी १९९० च्या ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना दोन पानी पत्र पाठवले होते आणि रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या आहेत, असे मान्य करायला त्यांच्या पत्नी एमिली शेंकेल तयार नाहीत, असे कळवले होते. या पत्राची व त्याला जोडलेल्या चार पानी टिपणाची माहिती आमले यांनी करून घेतलेली नाही आणि नेताजींच्या मृत्यूबद्दल संशोधन करण्यात ३० वर्षे खर्ची घालणाऱ्या रे यांनीदेखील आपल्या पुस्तकात कुठेही ‘त्या’ पत्राची वाच्यता केलेली नाही. नरसिंह रावांपासून नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा नावानिशीवार उल्लेख करणारे आणि त्या सर्वाशी या विषयासंदर्भात आपण सतत विचारविमर्श कसे करीत होतो किंवा त्यांच्या निर्णयांवर भाष्य तरी कसे करीत होतो, याची तपशीलात माहिती देणारे रे व्ही. पी. सिंगांबरोबरच्या या पत्रव्यवहाराबाबत मात्र मौन बाळगून आहेत, हे आमले यांच्या लक्षातच आले नसावे, असे दिसते.

बहुधा राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध असणाऱ्या या सहा पानी दस्ताऐवजाबद्दल आमले यांना माहितीच नसावी; तथापि त्यामुळे रे यांचा या गंभीर समस्येबाबतचा दुटप्पीपणा त्यांच्या लक्षातच आलेला नाही आणि ते या पुस्तकाला विश्वासार्हतेचे अंतिम प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले आहेत.

पूर्वग्रहविरहित मनाने या कूटप्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा एक अभ्यासक या नात्याने मी मात्र ती सहा पानेही अभ्यासली आहेत आणि ‘लेड टू रेस्ट’ हे ताजे पुस्तकही वाचले आहे. आमले यांना वस्तुस्थिती माहिती नाही, हा त्यांचा दोष मानता येणार नाही व त्यामुळे काही प्रमाणात तरी त्यांना सूट मिळू शकेल; पण आशीष रे यांचे काय?

त्या पत्रव्यवहाराबद्दल आपल्या पुस्तकात त्यांनी पाळलेले मौन निव्वळ ‘सोयीस्कर’ म्हणून सोडून देता येण्याजोगे नाही. ते आपमतलबी आहे; हेतुत: लपवाछपवी करणारे आहे.

रेंकोजी मंदिरातील एका कलशामध्ये ठेवलेल्या अस्थी नेताजींच्याच आहेत, असे शाहनवाझ खान यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्य चौकशी समितीतील दोन सदस्यांचे म्हणणे होते. इंदिरा गांधी यांनी नेमलेल्या एकसदस्य चौकशी आयोगानेही तोच निष्कर्ष उचलून धरला होता; तथापि त्यानंतरच्या सुमारे १५ वर्षांत अशा काही गोष्टी पुढे आल्या की,पुन्हा एकदा सरकारतर्फे चौकशी आयोग नेमला जाईल,असे वाटू लागले होते. तो धागा पकडून रे यांनी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना पत्र पाठवले होते. ‘एमिली शेंकेल यांच्याशी आपले बोलणे झाले असून टोकियोच्या रेंकोजी मंदिरातील अस्थिकलशात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या असाव्यात असे त्यांना वाटत नाही. त्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात, असेही त्यांना वाटत नाही,’ हे रे यांनी या पत्रात प्रारंभीच्या चार परिच्छेदांत नमूद केले होते. नंतरच्या परिच्छेदात ‘आपण नेताजींचे थोरले बंधू शरच्चंद्र बोस यांचे नातू असलो, तरी या विषयाचा खुल्या मनाने व अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला’ असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘१९४५ साली कथित विमान अपघातात सुभाषबाबू मरण पावलेच नाहीत असे ठामपणे म्हणता येत नाही, असे आपले मत बनले असून ते अजूनही जिवंत आहेत असे सूचित करणाऱ्यांचे म्हणणे आपण साफ अमान्य करतो,’ असा खुलासा त्यांनी केला होता.

नवा आयोग नेमण्याच्या फंदात पडण्यापेक्षा एखाद्या जाणकार माणसाकडे सर्व नव्या-जुन्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णायक अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवणे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर ठरेल,असा सल्ला रे यांनी त्या पत्राद्वारे व्ही. पी. सिंग यांना दिला होता आणि ‘त्या’ विमान अपघातात नेताजी मरण पावले, असा दावा करणाऱ्या पुराव्यांमधील अंतर्गत विसंगती व परस्परविरोध दाखवून देणारे टिपण त्या पत्राला जोडले होते. हेतू अर्थातच तशी जबाबदारी आपल्याकडे यावी, असे सुचवण्याचा होता.

तर, मुद्दा हा की, रे यांनी आपली ऑगस्ट, १९९० मधील ‘ती’ भूमिका या पुस्तकात दडवून का ठेवली आहे? रे हे प्रामाणिकपणाने या विषयाचा सोक्षमोक्ष लावू इच्छित होते, तर मग पारदर्शक पद्धतीने आधीची भूमिका का बदलली, नवे कोणते पुरावे शोधून काढले, हे त्यांनी सप्रमाण दाखवून द्यायला हवे होते आणि तशा विवेचनाच्या ओघात, आमले यांनी ज्या षड्यंत्र सिद्धांतांचा ‘रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगे’ अशा हेटाळणीच्या शब्दांत उल्लेख केला आहे, ते सिद्धान्त थोडक्यात मांडून त्यांचे खंडन करायला हवे होते.

नेताजी १९४५ साली ऑगस्टमध्ये मांचुरियामार्गे सोव्हिएत युनियनला गेले. पुढे ते तिकडे तुरुंगात होते, वगैरे मांडणी करणारा सिद्धान्त पूर्वीपासूनच फेटाळला जात होता. त्याला पुन्हा चालना मिळाली ती १९९४ च्या मे ते सप्टेंबर महिन्यांत मॉस्कोच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय अभ्यासकांच्या गटातील पूरबी रॉय या रशियन भाषेच्या जाणकार सदस्यांना योगायोगाने गवसलेल्या नेताजींबद्दलच्या ताज्या सोव्हिएत लेखांमुळे! कोलकात्याच्या ‘एशियाटिक सोसायटी’तर्फे १९१७ ते १९४७ या कालखंडातील भारतीय क्रांतिकारकांच्या सोव्हिएत युनियनशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी त्या तिकडे गेल्या होत्या. त्यासंबंधीची कागदपत्रे न्याहाळताना त्यांना अनपेक्षितपणे नेताजी १९४५ नंतरही हयात असल्याचे दर्शविणारे उल्लेख सापडत गेले. तशी असंख्य कागदपत्रे पुढील काळात त्यांनी देशोदेशींच्या अभिलेखागारांतून मिळवली. त्यातील प्रमुख कागदपत्रांचा धांडोळा घेऊन ‘द सर्च फॉर नेताजी : न्यू फाइंडिंग्ज’ हे पुस्तक लिहिले (प्रकाशक : पर्पल पीकॉक बुक्स अ‍ॅण्ड आर्ट्स प्रा. लि., २०११). त्याआधीही रॉय यांनी दिल्ली-कोलकात्यातील मान्यवर अभ्यासक-पत्रकारांच्या मेळाव्यात ही कागदपत्रे (या कागदपत्रांचे वजन ४० किलो भरले होते!) मांडली होती व याविषयी जनजागृती करण्याचे आपल्या परीने प्रयत्नही केले होते. मुखर्जी आयोगासमोरची त्यांची साक्षही लक्षवेधी ठरली होती.

पूरबी रॉय यांचा, त्यांच्या या पुस्तकाचा,पुस्तकात उल्लेखिलेल्या आणि अनुवादित करूनही दिलेल्या कागदपत्रांचा तर्कशुद्ध प्रतिवाद रे यांनी आपल्या पुस्तकात करणे योग्य ठरले असते. मात्र प्रतिवाद सोडाच, त्यांनी रॉय यांची साधी दखलही घेतलेली नाही. नेताजींच्या मृत्यूभोवतीचे गूढ उकलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या रे यांनी पूरबी रॉय यांच्याशी संपर्कच साधलेला दिसत नाही आणि तरीही आमले तो षड्यंत्र सिद्धान्त(?) ‘रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगा’ कसा आहे, हे रे यांच्या या पुस्तकात दाखवून देण्यात आले आहे, एवढेच नव्हे, तर ‘अपप्रचाराचे खांब उलथवून टाकणारी मांडणी त्यात आली आहे’ असे प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले आहेत!

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे १६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादला मरण पावलेले कुणी एक गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हे नेताजीच होते, असा दावा म्हणा किंवा आमले यांच्या परिभाषेत ‘षड्यंत्र सिद्धान्त’ म्हणा, गेली कित्येक वर्षे चर्चिला जातो आहे. अशोक टंडन यांच्या ‘नये लोग’ या हिंदी वृत्तपत्रातील १७ लेखांकापासून ‘हिंदुस्तान टाइम्स’तर्फे वीर संघवी- अनुज धर प्रभृती पत्रकारांनी दोन वर्षे चालवलेल्या शोधमोहिमेपर्यंत असंख्य पत्रकारांनी हा ‘षड्यंत्र सिद्धान्त’ उचलून धरण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणी दोन याचिकांची एकत्रित सुनावणी करून २०१३ साली उत्तर प्रदेश सरकारला बहुविध आदेश दिले. अखिलेश यादव यांच्या सरकारने २०१६ साली नाइलाजाने त्यातल्या काहींची तोंडदेखली अंमलबजावणीसुद्धा केली. हा संपूर्ण ‘षड्यंत्र सिद्धान्त’रे यांनी विचारातच घेतलेला नाही. त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याच सुमारास अधीर सोम या लखनौनिवासी तर्कशास्त्र्याने लिहिलेले ‘गुमनामी बाबा : अ केस हिस्ट्री’ (प्रकाशक : ईबीसी) हे पुस्तकही प्रसिद्ध झाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या १८ फेब्रुवारी २०१८ च्या अंकात या दोन्ही पुस्तकांचा परिचय प्रसिद्ध झाला आहे. रे यांना अधीर सोम यांचे पुस्तक उपलब्ध झाले नसणार हे स्पष्ट आहे, तथापि अधीरजींच्या पुस्तकात एका प्रकरणाच्या स्वरूपात छापलेले उच्च न्यायालयाचे निकालपत्र तर त्यांनी अभ्यासायलाच हवे होते. पुढील आनुषंगिक प्रवास, प्रत्यक्ष फैजाबादला भेट वगैरे प्रकारही त्यांनी करायलाच हवे होते. तसे काहीही न करताच त्यांनी आपल्या पुस्तकाला ‘लेड टू रेस्ट – द कॉण्ट्रोव्हर्सी ओव्हर सुभाषचंद्र बोस’स डेथ’ असे शीर्षक देण्याचा विचार केलाच कसा? आणि नेताजींच्या कन्या अनिता पाफ यांनी रे यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदात ‘जर शक्य असेल तर रेंकोजी मंदिरातील अस्थींची डीएनए चाचणी घेतली जावी म्हणजे उरलेसुरले संशय दूर होतील,’ असे म्हणून मारलेली महत्त्वाची मेख आमले यांच्या नजरेतून सुटली तरी कशी?

गुमनामी बाबा प्रकरणाचा शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध सोक्षमोक्ष लागल्याशिवाय हे गूढ पूर्णपणे उकलणारच नाही, हे आमले यांनी ओळखायला हवे होते. तसे त्यांनी केले असते तर रे यांच्या पुस्तकाला असे अंतिम निर्णायक प्रमाणपत्र देण्याची धाडसी व अभिनिवेशी घाई त्यांनी केलीच नसती. रे यांच्या पुस्तकात नवे कोणते पुरावे सादर करण्यात आले आहेत,याचे विवेचन न करताच षड्यंत्र सिद्धान्त मांडत राहिलेल्या एकाही अभ्यासकाचे म्हणणे पूर्वपक्ष म्हणून वाचकांसमोर ठेवण्याचे साधे टीकासूत्र दुर्लक्षित करून सरसकट सर्वावर नेहरू-गांधीद्वेषाचे हेत्वारोप करणे त्यांनी टाळले असते.
००००००००नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूप्रकरणावरील गूढाचा पडदा दूर करण्याचे सर्वच प्रयत्न वादग्रस्त ठरताना दिसतात. ते वाद राजकारणात आजही लागू असलेल्या धारणांशी निगडित असतात. आशीष रे यांचे ‘लेड टू रेस्ट’ हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. या पुस्तकाच्या ‘वादावर पडदा!’ (१४ एप्रिल) या परीक्षणलेखावरील आनंद हर्डीकर लिखित ‘फसवे पुस्तक, फसवा लेख’ (२१ एप्रिल) या प्रतिक्रियात्मक लेखाचा हा प्रतिवाद..

तोतयांचे बंड मोडताना..

० रवि आमले


आशीष रे यांचे ‘लेड टू रेस्ट’ हे पुस्तक फसवे आहे. त्यावरील रवि आमले यांचा ‘वादावर पडदा!’ हा परिचयलेख नव्हे, तर ‘गौरवलेख’ फसवा आहे...
- नेताजींसंबंधी पूर्वीपासून अभ्यास करणारे आणि आता दुसऱ्या एका पुस्तकाच्या परिचयलेखामुळे त्या अभ्यासाला पुन्हा चालना ज्यांना मिळाली ते रा. आनंद हर्डीकर यांचे हे मत. व्हॉटस्अॅप विद्यापीठातील इतिहास पदवीधरांनी असे मत मांडले असते, तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. रा. हर्डीकर हे गंभीर अभ्यासक आहेत. शिवाय त्यांनी राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध असलेला आशीष रे व व्ही. पी. सिंग यांच्यातील पत्रव्यवहाराचा ‘सहा पानी दस्तावेज’ही अभ्यासला आहे व ‘पूर्वग्रहविरहित मनाने’ या कूटप्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा त्यांनी केलेला प्रतिवाद गांभीर्यानेच घ्यावा लागेल. या लेखातून त्यांनी काही आरोपवजा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील पहिला प्रश्न असा की, रे यांनी ऑगस्ट, १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना पाठविलेल्या पत्राबाबत मौन का बाळगले?

काय होती रे यांच्या त्या पत्रातील भूमिका? तर त्यांना १९९० मध्ये असे वाटत होते की, नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालेला नाही. त्या अपघाताबाबतच्या पुराव्यांतील अंतर्गत विसंगती, परस्परविरोध लक्षात घेऊन त्यांचे तसे मत झाले होते. तसे त्यांनी सरकारला कळविले होते. याबाबत रा. हर्डीकर यांचा आरोप असा की- ही माहिती रे यांनी ‘आपमतलबी’पणे आणि ‘लपवाछपवी’च्या हेतूने दडवली. तो रे यांचा दुटप्पीपणा होता आणि हे रवि आमले यांच्या लक्षातच आले नाही. वस्तुत: ते पत्र शोधण्यासाठी राष्ट्रीय अभिलेखागारापर्यंतही जाण्याची आवश्यकता नाही. त्याचा उल्लेख अनुज धर यांच्या ‘इंडियाज् बिगेस्ट कव्हर-अप’ या पुस्तकातही येतो. पण प्रश्न आमलेंना ती माहिती असण्या-नसण्याचा नाहीच. प्रश्न रे यांनी त्याबाबत मौन बाळगून दुटप्पीपणा केला की काय, हा आहे. आता समोर असणारे पुरावे, त्यांचे विश्लेषण, अभ्यास यातून एखाद्याने आपले आधीचे मत बदलले, तर त्यास दुटप्पीपणा म्हणावे ही इतिहासाच्या शास्त्रातील नवी पद्धत आहे की काय, याची कल्पना नाही. परंतु ‘१९९५ पर्यंत’ रे यांचे पूर्वीचे मत बदलले होते. नेताजींचा मृत्यू अपघातातच झाला असल्याचे ‘पुरेसे नि:संदिग्ध पुरावे’ आपणासमोर आले होते, असे रे यांनी या पुस्तकातच म्हणून ठेवले आहे. यावर रा. हर्डीकर यांचा सवाल आहेच, की त्यांनी (पक्षी- रे यांनी) कोणते नवे पुरावे शोधून काढले हे सप्रमाण दाखवून द्यायला हवे होते. आता २०१५-१६ मध्ये केंद्र आणि प. बंगाल सरकारने त्यांच्याकडील गोपनीय फायली खुल्या केल्या. नेताजी १९४५ नंतर रशियात गेले, तेथे स्टॅलिनने त्यांना अटकेत ठेवले, असा प्रवाद होता. ज्येष्ठ संपादक दिवंगत गोविंदराव तळवलकर हे नेताजींबाबत संशोधन करीत होते. त्यांनी त्याबाबत रशियाकडे विचारणा केली असता, नेताजींना रशियात कोणत्याही तुरुंगात ठेवले नसल्याचा स्पष्ट निर्वाळा रशियन स्टेट अर्काइव्हकडून देण्यात आला. ती पत्रे १३ जुलै आणि १३ नोव्हेंबर २०१५ ची. या सगळ्याच्या अभ्यासातून, स्वत: केलेल्या संशोधनातून रे यांनी बोस यांच्याविषयीच्या षड्यंत्र सिद्धांतांना विराम देण्याचा जो प्रयत्न केला आहे,त्यातूनच तर त्यांचे पुस्तक उभे राहिले आहे.

मात्र रा. हर्डीकरांसाठी ते पुरेसे नसावे. त्यांचे म्हणणे एकच की, डॉ. पूरबी रॉय यांच्या पुस्तकाचा तर्कशुद्ध प्रतिवाद कुठे रे यांनी केलाय? मग ‘तो (म्हणजे नेताजी १९४५ नंतर रशियात होते हा) षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगा असल्याचे’ रे यांनी दाखवून दिले आहे, असे आमले कसे म्हणतात? तर ते असे म्हणतात, याचे कारण एक तर ‘कॉक अ‍ॅण्ड बुल स्टोरीज्’ या प्रकरणात तो षड्यंत्र सिद्धांतच असल्याचे रे यांनी म्हटले आहे. रशियाकडून आलेल्या अधिकृत उत्तरांनी तो प्रश्न संपविला असून, त्यावर २०१६ मध्ये जाहीर झालेल्या गोपनीय फायलींनी शिक्कामोर्तब केले आहे, असे रे सांगत आहेत. आता रे यांची ती मांडणी तर्कशुद्ध नाही असे रा. हर्डीकरांना ते पुस्तक वाचूनही वाटत असेल, तर त्यास कोण काय करणार?

परंतु रा. हर्डीकर एवढय़ावरच थांबत नाहीत. रे यांनी काय काय करायला हवे होते याचा सल्ला देताना, ते ‘गुमनामीबाबा प्रकरणा’कडे वळतात आणि म्हणतात, की गुमनामीबाबा हे नेताजीच असल्याचा दावा एवढी वर्षे केला जात आहे. पण हा संपूर्ण ‘षड्यंत्र सिद्धांत’ रे यांनी विचारातच घेतलेला नाही. वस्तुत: त्याची सविस्तर दखल रे यांनी घेतलेली आहे. हे गुमनामीबाबा म्हणजे कृष्णदत्त उपाध्याय ऊर्फ कप्तानबाबा होते व ते एका खून प्रकरणात पसार झाले होते, असे सांगणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. रे यांनी त्याचाही उल्लेख केला आहे. रा. हर्डीकर यांच्याकडील पुस्तकाच्या प्रतीतून कदाचित ती पाने गहाळ असतील. अन्यथा त्यांनी असा दावा का बरे केला असता? असो.

या प्रतिवादलेखाचा शेवट करताना रा. हर्डीकर यांनी, आमले यांनी या पुस्तकाला अंतिम निर्णायक प्रमाणपत्र देण्याची धाडसी व अभिनिवेशी घाई केली असल्याचे म्हटले आहे. धाडस का? तर अद्याप गुमनामीबाबाचे गूढ उकलले नाही म्हणून! बरोबरच आहे. ते उकलायलाच हवे. पण उकलले तरी, ‘गुमनामीबाबा हेच नेताजी’ ही ज्यांची श्रद्धा आहे किंवा त्या श्रद्धेवर ज्यांचे स्वार्थ उभे आहेत ते त्यावर विश्वास ठेवतील? किमान पेशवाईतील तोतयांच्या बंडांचा इतिहास ज्यांना माहीत आहे ते तरी तसे समजण्याचे धाडस करणार नाहीत. गुमनामीबाबाबद्दल तर एक साधा प्रश्न आहे. नेताजी हे एवढे मोठे नेते होते की, त्यांना भारतात येण्यापासून देशातील कोणतीही शक्ती अडवू शकली नसती. तरीही नेताजी भारतात येऊन गुमनाम बनून का राहिले? त्यांचे देशावर प्रेम नव्हते? बरे संन्यास घेऊन एकदा गुमनाम राहायचे ठरविल्यानंतर ते कुणाला रशियातल्या गोष्टी का सांगत बसले असते? किंवा मग त्यांच्या सामानात चार्ल्स बर्लिट्झचे ‘द बम्र्युडा ट्रँगल’, जॉर्ज अॅडम्स्कीचे ‘फ्लाइंग सॉसर्स फेअरवेल’ वा आय. जी. बर्नहॅमचे ‘सेलिब्रेटेड क्राइम्स’ अशी पुस्तके का सापडली असती? अशा प्रश्नांना उत्तरे नाहीत आणि तरीही अगदी नेताजींचे काही नातेवाईक गुमनामीबाबालाच नेताजी समजून चालले आहेत. अर्थात, आशीष रे हेही नेताजींचेच नातेवाईक. ते मात्र तोतयांची बंडे मोडून काढत आहेत. त्याचबरोबर नेताजींच्या प्रतिमेचे पुनर्लेखन करण्याचे प्रयत्नही ते उधळवून लावू पाहात आहेत.

आजच्या - म्हणजे ‘नेताजी विरुद्ध नेहरू’ असा सामना लढवून, पंडित नेहरूंना त्यात खलनायक ठरविण्याचा उद्योग लोकप्रिय असल्याच्या – काळात नेताजींच्या मृत्यूविषयीचे षड्यंत्र सिद्धांत काय आहेत व त्यांची वासलात रे यांनी कशी लावली हे सांगणे आवश्यक खरे, परंतु त्याहून महत्त्वाचे होते हे षड्यंत्र सिद्धांत समाजमनातील ज्या पूर्वग्रहांच्या, प्रोपगंडाच्या पायांवर उभे आहेत, ज्यातून व ज्यासाठी लोकांच्या मनात संशयाची भूतं जागविण्यात आली आहेत, त्यांचा लक्ष्यभेद रे यांनी कसा केला हे सांगणे. असा लक्ष्यभेद करणे ही रे यांच्या पुस्तकलेखनामागील एक प्रेरणा असल्याचे सतत जाणवत राहते. त्याबाबतचा परिचयलेख लिहिताना बाकीचे काय नजरेत आले नाही, यापेक्षा ती प्रेरणा नजरेआड झाली नाही ना हे पाहणे महत्त्वाचे होते. ते नीट पाहिले गेले हे आता समजते आहे.

नेताजी फाईल्स : एका षड्‌यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा।। ती बातमी ।।

२४ ऑगस्ट १९४५.

दुसरे महायुद्ध आता संपल्यात जमा होते. जपानने शरणागती पत्करून आठ दिवस लोटले होते. दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता. या युद्धात हिंदुस्थान फॅसिस्ट आणि नाझी शक्तींच्या विरोधात होता, हे खरे. या शक्ती हरल्या याचा आनंद होताच. पण याच बरोबर या महायुद्धात हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकलेल्या आझाद हिंद फौजेलाही माघार घ्यावी लागली होते. या फौजेकडे अवघा हिंदुस्थान मोठ्या आशेने पाहात होता. पण आता सगळेच संपले होते. वातावरण विचित्र मळभलेले होते.

अशात अचानक ती बातमी येऊन धडकली.

‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू’
जपानच्या ‘डोमेई’या वृत्तसंस्थेने २३ ऑगस्टला दिलेली ती बातमी. २४ तारखेच्या ‘हिंदुस्थान स्टँडर्ड’मध्ये ती लंडन डेटलाईनने पहिल्या पानावर होती. ‘हिंदू’आणि ‘हिंदुस्थान टाइम्स’ही तेव्हाची दोन मोठी वृत्तपत्रे. त्यात ती २५ला आली.
या दुर्वार्तेने अवघा देश हादरला.

दुःख एवढे प्रचंड होते की कोणाचा त्या घटनेवर विश्वासच बसेना.

कसा बसणार?
नेताजी हे चकमा देण्यात महामाहीर होते. अवघ्या चार वर्षांपूर्वी त्यांनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. १७ जानेवारी १९४१ रोजी त्यांच्याविरुद्धच्या राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. त्याच दिवशी ब्रिटिशांच्या नजरकैदेतून निसटले होते. काळाच्या हातीही ते अशाच तुरी देतील याबद्दल सर्वांना खात्री होती.
।। अपघात ।।

नेताजी जपानच्या साह्याने ब्रिटिशांशी लढत होते. १५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली. ६ तारखेला हिरोशिमा आणि त्यानंतर तिस-या दिवशी नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने पुरते कोसळलेले ते राष्ट्र त्यानंतर केव्हाही शरण जाईल असे वातावरण होते. त्याच वातावरणात, १३ ऑगस्ट रोजी नेताजी सिंगापूरला पोचले होते. आता पुढे काय, हा त्यांच्यासमोरील सवाल होता. मार्ग दोन होते. एक तर ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करणे किंवा निसटणे. यावर विचार करण्यासाठी त्यांनी १४ ऑगस्टला आपल्या सहका-यांची बैठक बोलावली. एस ए अय्यर, डॉ. एम के लक्ष्मय्या, ए एन सरकार, एम झेड कियानी, मे. जन. अलगप्पन, कर्नल जी आर नागर आणि हबिबुर रहमान हे बैठकीला उपस्थित होते. तोवर जपानच्या शरणागतीचा निर्णय झाला होता. प्रश्न होता, तो जपानबरोबर आझाद हिंद फौजेनेही शरण जायचे की स्वतंत्रपणे?बैठकीत ठरले, स्वतंत्रपणे. पण त्याला जपानच्या मंजुरीची आवश्यकता होती. जपानचे सिंगापूरमधील कमांडर तशी परवानगी देऊ शकत नव्हते. तेव्हा ठरले, की टोक्योला विचारायचे. पण वायरलेस संपर्क तुटलेला होता. तेव्हा मग सर्वांनी मिळून ठरवले की नेताजींनी स्वतःच टोक्योला जायचे. त्यासाठी आधी बँकॉकला जावे लागणार होते. तेथे आझाद हिंद सरकारचे मुख्यालय होते.

(मे. जनरल जगन्नाथ भोसले यांनी ब्रिटिश गुप्तचरांना दिलेल्या जबानीनुसार,) १६ ऑगस्टला नेताजी बँकॉकला पोचले. त्यांच्यासोबत अय्यर, रहमान आणि लेफ्ट. कर्नल प्रीतमसिंग होते. तेथे त्यांनी आझाद हिंद सरकारमधील जपान नियुक्त मंत्री हचिया टेरूको, तसेच लेफ्ट. जन. सबुरो इसोदा आणि कर्नल कागावा यांच्याशी शरणागतीबाबत चर्चा केली. हचिया यांनी सुचविले, की त्यांनी सायगॉनला (म्हणजे आजची हो ची मिन्ह सिटी) जावे आणि फिल्ड मार्शल काऊंट तेराऊची हिसैची यांना भेटावे. नेताजींची काहीच हरकत नव्हती. हचिया आणि इसोदा हेही त्यांच्यसमवेत येणार होते.

१७ ऑगस्टला दुपारी ते सायगॉनच्या विमातळावर उतरले. पण तेराऊची हेही आझाद हिंद फौजेच्या शरणागतीबाबत काही निर्णय देऊ शकत नव्हते. टोक्योहून त्यांना त्याबाबत आदेश आलेला नव्हता. आता टोक्योला जाण्याखेरीज पर्याय उरला नव्हता.

पण तिकडे जायचे कसे?नेताजी आणि त्यांच्या सहका-यांसाठी विमान उपलब्ध करून द्यायचे कसे?
दोस्त राष्ट्रांनी जपानच्या विमानांना उड्डाणबंदी घातली होती. मात्र सायगॉनहून एका लष्करी विमानाला परवानगी मिळाली होती. पण त्यात एकच जागा शिल्लक होती. पण नेताजींना एकटे सोडण्यास त्यांचे सहकारी तयार नव्हते. अखेर आपले एडीसी कर्नल हबिबुर रहमान यांना सोबत घेण्याचे नेताजींनी ठरवले. कशीबशी आणखी एका जागेची व्यवस्था करण्यात आली.
ते होते मित्सुबिशी की-२१ दोन इंजिनवाले बॉम्बफेकी विमान. त्यात आणखी ११-१२ प्रवासी होते. लेफ्ट. जन. सुनामसा शिदेई हे त्यांपैकी एक. ते रशियन भाषेचे जाणकार. क्वांटुंग आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती झाली होती. ते मांचुरियाला निघाले होते.

रात्री सातच्या सुमारास ते विमान तौरेनला (आताचे द. व्हिएतनाममधील दा नांग शहर) उतरले. रात्रीचा मुक्काम तेथेच होता. नेताजी आणि त्यांचे सहकारी एका हॉटेलमध्ये – बहुधा हॉटेल मोरीनमध्ये - थांबले. विमान सायगॉनहून निघाले तेव्हा त्यात आधीच जास्त वजन होते. त्यामुळे नेताजींना त्यांच्याकडील सामानाच्या काही बॅगा मागे ठेवाव्या लागल्या होत्या. तरीही उड्डाण करताना विमानाला संपूर्ण धावपट्टीचा वापर करावा लागला होता. त्यामुळे तौरेनला उतरल्यानंतर त्या विमानातील १२ विमानविरोधी मशिनगन काढून टाकण्यात आल्या. वजन किमान ६०० किलोने हलके झाले.

१८ ऑगस्ट १९४५. हाच तो काळा दिवस.

त्या दिवशी सकाळी त्या विमानाने व्हिएतनाममधील तौरेनहून उड्डाण केले. दुपारी दोनच्या सुमारास ते फार्मोसातील (म्हणजे आताचे तैवान) तैहोकू विमानतळावर उतरले.
जपानी एअर स्टाफ ऑफिसर मे. तारो कोनो हे त्या विमानानेच प्रवास करीत होते. (त्यांनी मे. जन. शाहनवाझ खान आयोगासमोर दिलेल्या जबानीनुसार,) विमानाचे डावे इंजीन नीट काम करीत नसल्याचे त्यांना वाटले. त्यांनी आत जाऊन त्याची तपासणी केली. पण ते व्यवस्थित काम करीत असल्याचे दिसत होते. त्यांच्यासोबत कॅ. नाकामुरा हा विमानतळावरील अभियंता होता. त्यानेही ते तपासून पाहिले. त्यालाही शंका आली होती. पण तपासणीत ते व्यवस्थित असल्याचे आढळून आले.
ही तपासणी सुरू असताना सारे प्रवासी विमानतळाच्या इमारतीत – म्हणजे इमारत म्हणून तेथे जे काही शिल्लक राहिले होते – त्यात गेले होते. तेथे एक तंबू उभारण्यात आला होता. त्यात उपाहाराची व्यवस्था होती. नेताजींनी सँडविच आणि एक-दोन केळी खाल्ली. तोवर अडीच वाजत आले होते. कोणीतरी सर्वांना विमानात बसण्याची सूचना केली.
अडीच वाजता विमान धावपट्टीवरून धावू लागले. हलकेच त्याचा पुढचा भाग उचलला गेला. ते हवेत झेपावले. ३०-४० मीटर उंचीवर असताना अचानक मोठा आवाज झाला. विमान डावीकडे कलले. कॅ. नाकामुरा यांच्या डोळ्यांसमोर हे घडत होते. विमानाच्या डाव्या बाजूने काही तरी खाली पडल्याचे त्यांना दिसले. तो प्रोपेलर होता. पाहता पाहता विमान हेलकावे खावू लागले आणि धावपट्टीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर ते कोसळले. त्यावेळी त्याचा वेग किमान ३०० किमी प्रती तास एवढा असावा. कोसळताच विमानाने पेट घेतला.
(कर्नल रहमान यांच्या जबानीनुसार,) नेताजींच्या डोक्याला मार लागला होता. पण ते कसेबसे उभे राहिले. विमानाचा पुढचा भाग चेमटला होता. आगीने वेढला होता. ते मागच्या बाजूने बाहेर पडण्यास निघाले. पण ते अशक्य होते. आतल्या पेट्या आणि अन्य सामानाने दरवाजा अडला होता.

कर्नल रहमान नेताजींना म्हणाले, आगे से निकलिये, नेताजी. मागे रस्ता नाहीये.
पुढचा दरवाजाही आगीच्या ज्वालांनी वेढलेला होता. नेताजी सरळ त्या आगीतून धावत गेले. रहमानही त्यांच्या मागून बाहेर पडले.
बाहेर पडताच त्यांनी पाहिले, तर पुढे दहा यार्डावर नेताजी उभे होते. त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला होता. अपघातात फुटलेल्या टाकीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर सांडले होते. त्या पेट्रोलमुळे त्यांचे कपडे पेटले होते. रहमान त्यांच्याकडे धावले. त्यांनी त्यांचे शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर बेल्ट होता. त्यामुळे शर्ट काढणे अवघड झाले होते. त्यांच्या पँटीने मात्र पेट घेतला नव्हता.
रहमान यांनी नेताजींना जमिनीवर झोपवले. त्यांचे अंग भाजले होते. डोक्यावर, बहुधा डाव्या बाजूला मोठी, सुमारे चार इंचाची जखम झाली होती. चेहरा आगीने पोळला होता. केस जळाले होते. अंगावरची भाजलेली कातडी लोंबत होती. नेताजींना प्रचंड वेदना होत असाव्यात.
अपघातात मार बसल्याने, थकव्याने रहमानही नेताजींच्या बाजूला कोसळले. तेवढ्यात त्या अवस्थेतही त्या महान नेत्याने त्यांनी विचारले, ‘आप को जादा तो नहीं लगी?’
रहमान म्हणाले, ‘मी ठीक आहे असं वाटतंय.’
त्यावर नेताजी म्हणाले, ‘मी वाचत नाही असं दिसतंय.’
काही क्षणांनी ते म्हणाले, ‘जब अपने मुल्क वापस जायें तो मुल्की भाईयों को बतानी की मैं आखरी दम तक मुल्क की आझादी के लिये लडता रहा हूँ. वह जंग-ए-आझादी को जारी रखें. हिंदुस्तान जरूर आझाद होगा. उस को कोई गुलाम नहीं रख सकता.’
थोड्या वेळातच त्यांना जवळच्या नानमॉन लष्करी इस्पितळात नेण्यात आले. ते इस्पितळात पोचले तेव्हा दुपारचे तीन वाजत आले होते.
नेताजींवर तातडीने उपचार सुरू झाले. पण...
रात्री ९ वाजता त्यांचे देहावसान झाले.।। अविश्वास ।।

नेताजींच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा म. गांधी पुण्यात होते. त्यांच्या सायंकालीन प्रार्थनासभेतकाँग्रेसचा ध्वज अर्ध्यावर घेण्यात आला. गांधीजी मात्र काहीच बोलले नाहीत. पं. नेहरूंना अबोटाबादमध्ये ही बातमी समजली. ती ऐकून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पण ही बातमी खरी मानण्यास कोणाचेही मन तयार नव्हते. तशात २९ ऑगस्ट १९४५ ला आणखी एक घटना घडली.
त्या दिवशी पं. नेहरूंची पत्रकारपरिषद होती. पत्रकार त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारत होते. अचानक शिकॅगो ट्रिब्यूनचे एक वार्ताहर – अल्फ्रेड वॅग - उभे राहिले. म्हणाले, ‘मी चार दिवसांपूर्वीच सायगॉनमध्ये नेताजींना जिवंत पाहिलं!’
हे साधे विधान नव्हते. एका षड्यंत्र सिद्धान्ताचे ते बीज होते.
दोनच दिवसांत, १ सप्टेंबर रोजी लंडनच्या संडे ऑब्झर्व्हरने त्याच्या दाव्याला प्रसिद्धी दिली. बोस यांचा मृत्यू विमान अपघात झाल्याचे जपानतर्फे सांगण्यात येत असले, तरी त्यावर विश्वास ठेवण्यास ब्रिटिश वा अमेरिकी लष्करी अधिकारी तयार नसल्याचे त्या बातमीत म्हटले होते.
आता भारतातील नेतेही स्पष्टपणे हेच म्हणू लागले होते. ११ सप्टेंबरला झाशीतील सभेत नेहरूंनी आपला नेताजींच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास नसल्याचे जाहीरपणे सांगितले. गांधीजीही तेच सांगत होते. ‘नेताजींची रक्षा जरी कोणी मला दाखविली तरी मी ते जिवंत नाहीत यावर विश्वास ठेवणार नाही,’असे गांधीजींचे विधान होते.
केंद्र सरकारच्या एका गोपनीय फाईलमध्ये (क्र. २७३/आयएनए) यालाच दुजोरा देणारी माहिती मिळते. त्या फाईलमधील एक उतारा असा आहे :
‘बोस हे जीवंत असून लपून बसले आहेत असे म. गांधींनी जानेवारीच्या सुरूवातीला जाहीरपणे सांगितले होते. ते हे कशावरून म्हणतात याचा कोणतीही समाधानकारक कारणे त्यांनी दिलेली नाहीत. आपला आतला आवाज असे म्हणतो असे ते सांगतात. पण काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की गांधीजींचा हा आतला आवाज म्हणजे त्यांना मिळालेली गोपनीय माहिती आहे, असे काँग्रेसजनांचे म्हणणए आहे. एवढेच नव्हे, तर एका गोपनीय अहवालानुसार नेहरूंना बोस यांचे एक पत्र आले आहे. त्यात बोस यांनी म्हटले आहे, की आपण रशियामध्ये असून, तेथून पळून भारतात येण्याची आपली इच्छा आहे. आपण चित्रालमार्गे येऊ. तेथे शरदचंद्र बोस यांचा एक मुलगा आपणास भेटेल. पण ही कहाणी असंभव वाटते.’
ज्या गुप्तचराने हा अहवाल दिला होता, त्याला स्वतः हे सारे असंभाव्य वाटत असले, तरी भारतीय जनतेची भावना वेगळी होती.

मधल्या काळात गांधीजींचे मत मात्र बदलले होते. त्याला कारण होते, नेताजींचे जवळचे सहकारी कर्नल हबिबुर रहमान.

नेताजींच्या आझाद हिंद फौजेतील जवानांवरील खटला सुरू होता. त्यांना काबुल लाइन्स आणि लाल किल्ला येथे कैदेत ठेवण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत गांधीजी त्या जवानांना भेटण्यासाठी गेले असताना रहमान यांच्याशी त्यांची भेट झाली. रहमान यांनी त्या अपघाताबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. त्याच्या दुस-या दिवशी प्रार्थनासभेत गांधीजींनी आपला आधीचा विश्वास चूक होता. नेताजी आता आपल्यात नाहीत असे स्पष्ट केले.

३० मार्च १९४६च्या ‘हरिजन’मध्येही त्यांनी याविषयी लिहिले होते. –
‘काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत सुभाष बोस यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या. मी त्यांवर विश्वास ठेवला होता. पण नंतर त्या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले. तेव्हापासून मला नेहमी असे वाटते, की स्वराज्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय नेताजी आपल्याला सोडून जाणार नाहीत. आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी शत्रूंच्याच नव्हे, तर जगाच्या डोळ्यांत धूळ फेकण्याची थोर क्षमता नेताजींमध्ये असल्याचे मला माहीत आहे. त्यानेच माझ्या या विश्वासाला बळ दिले. नेताजी हयात आहेत या माझ्या विश्वासामागे केवळ हीच कारणे होती...’
परंतु गांधीजींच्या या निवेदनानंतरही लोकांचे समाधान झाले नव्हते. पुढे १९४९ मध्ये भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीही बोस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पण लोकांच्या मनातील नेताजींची प्रतिमा त्यांना मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवू देत नव्हती.
अनेकांच्या मते ब्रिटिशांच्या डोळ्यांत धूळ फेकून नेताजी लेफ्ट. जन. सुनामसा शिदेई यांच्यासमवेत गुपचूप रशियाला गेले होते. आपल्या मागचा ब्रिटिशांचा ससेमिरा टाळण्यासाठीच त्यांनी ही विमान अपघाताची बनावट कहाणी प्रसृत केली होती. कर्नल हबिबुर रहमान यांना ते माहीत होते. परंतु त्यांना नेताजींनी गोपनीयतेची शपथ दिली होती.

खुद्द नेताजींचे बंधु शरदचंद्र बोस यांनाही असेच वाटत होते, की अपघात ही दंतकथा आहे.


।। चौकशी ।।

नेताजींच्या मृत्यूबद्दल शंका केवळ भारतीयांनाच होती असे नव्हे. २४ ऑगस्ट १९४५ रोजी ही बातमी ऐकल्यानंतर व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी आपल्या रोजनिशीत नोंद केली होती :हे खरे असेल?
नेताजींसारख्या नेत्याबद्दल अशी बातमी आल्यानंतर त्याची खातरजमा केली जाणार नाही हे शक्यच नव्हते. अडमिरल माऊंटबॅटन यांच्याकडे त्यावेळी ईशान्य आशिया आणि भारत कमांडची जबाबदारी होती. डोमेई वृत्तसंस्थेने ती बातमी दिल्यानंतर लगेचच, ३० ऑगस्ट १९४५ रोजी त्यांच्या मुख्यालयाने त्याची चौकशी सुरू केली. जपान सरकारकडे त्याबाबतचा अहवाल मागण्यात आला. युद्ध समाप्ती काळाच्या त्या धामधुमीत जपान सरकारकडे संपूर्ण माहिती आलेली नव्हती. तेव्हा १५ सप्टेंबर १९४५ ला एक अंतरीम अहवाल पाठविण्यात आला. त्यात नेताजींच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे नमूद करण्यात आले होते.

पण त्यानेही ब्रिटिश सरकारचे समाधान झाले नव्हते. लष्करी गुप्तचर संघटना, तसेच इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांच्याकडे त्या घटनेची खातरजमा करण्याचे काम सोपविण्यात आले. सप्टेंबर १९४५ मध्ये आयबीचे सहायक संचालक फिलिप फिने यांना बँकॉकला, तर सहायक संचालक डब्लू एफ एम डेव्हिस यांना सायगॉनला पाठविण्यात आले. फिने यांच्या चौकशीतून एक बाब स्पष्टपणे समोर आली. ती म्हणजे नेताजी यांचा ब्रिटिशांना शरण जाण्याचा मुळीच विचार नव्हता. रशियाच्या मदतीने स्वातंत्र्ययुद्ध सुरू ठेवण्याची योजना त्यांनी आखली होती आणि जपानी अधिका-यांच्या मदतीने ते रशियाला जाणार होते. मात्र विमान अपघातात बोस यांचे निधन झाल्याची खबर खरी असल्याचे फिने यांच्या चौकशीत आढळून आले.
यानंतरही ब्रिटिश सरकारचा त्या बातमीच्या सत्यतेवर विश्वास बसत नव्हता असे दिसते. कारण १६ मे १९४६ रोजी लष्कराच्या ईशान्य कमांडतर्फे लेफ्ट. कर्नल जे जी फिगेस यांना चौकशीला जुंपण्यात आले होते. त्यातूनही वेगळे काहीच समोर आले नाही.
भारतातील माध्यमेही या चौकशीत मागे नव्हती. ‘फ्री प्रेस जर्नल’चे एस सदानंद यांनी त्यांच्या वृत्तसंस्थेतर्फे हरिन शाह या पत्रकारास दुर्घटनास्थळी पाठविले होते. ते २२ ऑगस्ट १९४६ला फॉर्मोसाला पोचले. नेताजींवर ज्या इस्पितळात उपचार करण्यात आले तेथील अनेकांशी ते बोलले. त्यातूनही नेताजींचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी अपघाती मृत्यू झाल्याची दुर्वार्ता खरी असल्याचेच निष्पन्न झाले.

एव्हाना भारताला स्वातंत्र्याचे वेध लागले होते. त्या सर्व धामधुमीत नेताजींच्या मृत्यूचा विषय मागे पडला. पण म्हणून लोकांना नेताजींचा विसर पडला नव्हता.

उलट फाळणीच्या काळात तर त्यांच्या आठवणी अधिक उफाळून येत होत्या.

सुभाषबाबू हिंदु-मुस्लिम ऐक्याचे बिनीचे शिलेदार होते. १९३८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना, हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील संबंधांतील सुधारणा हा त्यांच्या प्राथमिकतेचा विषय होता. आझाद हिंद फौजेतही त्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्यातील ऐक्यासाठी प्रयत्न केले होते. अशी त्या काळात असती, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते अशी आशा लोकांच्या मनात तरळून जात होती.

नेताजींच्या स्मृती भारतीयांच्या मनःपटलावर कोरल्या गेल्या होत्या.


।। आयोग ।।

भारतात आता स्वातंत्र्याचे मोकळे वारे वाहात होते. देश नव्या दमाने उभा राहू पाहात होता.

नेताजींच्या त्या अपघातास आता पाच वर्षांचा काळ लोटला होता. लोकांनी पुन्हा एकदा नेताजींबाबतचे सवाल विचारण्यास सुरूवात केली होती.

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर १९३९मध्ये नेताजींनी काँग्रेसमध्ये फॉरवर्ड ब्लॉक या गटाची स्थापना केली होती. १९४०मध्ये त्यांनी त्यास स्वतंत्र पक्षाचे स्वरूप दिले. त्याचे पहिले सरचिटणीस होतो एच. व्ही. कामथ. नेताजींचे कट्टर अनुयायी. पुढे ते घटनासमितीवरही निवडून आले. १९५१ मध्ये त्यांनी नेताजींच्या कथित मृत्यूसंबंधी सरकारला प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरात उपपरराष्ट्रमंत्री बी. व्ही. केसकर यांनी नेताजींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पण अशा उत्तरांनी नेताजींच्या अनुयायांचे समाधान होणे शक्य नव्हते. पुढच्याच वर्षी प. बंगालच्या विधानसभेत याच प्रश्नावरून गदारोळ झाला. लोकसभेच्या दर अधिवेशनात पुन्हा पुन्हा हा सवाल येत होता. वर्तमानपत्रांतून त्याची चर्चा होत होती. सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. प्रकरण संपले आहे. त्याची चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारचे म्हणणे होते.

अशात १८ सप्टेंबर १९५५ रोजी जपानच्या निप्पॉन टाइम्स या दैनिकात बातमी आली. तिचा मथळा होता – ‘अलाइव्ह ऑर मर्डर्ड?– हयात की हत्या?:नेताजींबद्दलच्या सत्याची भारतीयांची मागणी’
या वृत्ताने जपानबरोबरच भारतातही खळबळ माजली. चौकशीची मागणी अधिक जोर धरू लागली. पंतप्रधान नेहरू आता त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. त्यांनी भारतीय मुत्सद्दी बी. आर. सेन आणि प. बंगालचे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्याशी सल्लामसलत केली आणि अखेर १३ ऑक्टोबर १९५५ रोजी नेताजींच्या कथित मृत्यूच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. त्याची जबाबदारी सोपविली जन. शाहनवाझ खान यांच्याकडे.

नेताजींसमवेत लढलेला हा सेनानी. त्यांचा विश्वासू. लालकिल्ला खटल्यात राजद्रोहाच्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात देशभरात वादळ उठले. त्यापुढे ब्रिटिश सरकार नमले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी गांधीजींचे अनुयायित्व पत्करले.
नेहरू सरकारने नेताजी प्रकरणाच्या चौकशी आयोगाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविली. सदस्य म्हणून सनदी अधिकारी शशांक मित्र आणि सुभाषबाबूंचे बंधु सुरेशचंद्र बोस यांची नियुक्ती करण्यात आली.

नेताजी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने नेमलेला हा पहिला आयोग. त्याचा निष्कर्ष सरकारच्या आजवरच्या भूमिकेशी सुसंगत असाच होता. पण तो बहुमताने काढलेला निष्कर्ष होता. आयोगाचे तिसरे सदस्य सुरेशचंद्र बोस यांच्या मते नेताजी अजून हयात होते!
आयोगाच्या अहवालास त्यांनी आपले विरोधी मत जोडले होते. नंतर नोव्हेंबर १९५६ मध्ये त्यांनी ते स्वतःच प्रसिद्ध केले. जन. शाहनवाझ खान यांना सत्य शोधायचे नव्हते. त्यांना केवळ पुराव्यांमधील फटी बुजवायच्या होत्या, अशा आशयाचा आरोप त्यात त्यांनी केला होता. नेताजींना तो अपघात झालाच नाही. ते ठरल्यानुसार रशियाला गेले. कर्नल रहमान हे त्यांचे परमविश्वासू. त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली असावी. त्यामुळेच ते अपघाती मृत्यूची कहाणी सांगत आहेत, असे सुरेशबाबूंचे म्हणणे होते. या मतच्या शेवटी त्यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केले होते, की सरकारकडून सर्व गोपनीय कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी करा.

शाहनवाझ आयोगाच्या अहवालानंतर सरकारच्या लेखी खरे तर हा प्रश्न संपला होता. समितीने नेताजींच्या मृत्यूच्या घटनेवर शिक्कामोर्तब केले होते. पण सुरेशचंद्राच्या मतामुळे त्या सगळ्यावर पाणी पडले होते. लोकांच्या मनातील शंका-कुशंका वाढत चालल्या होत्या. या लोकभावनेचा फायदा उठविण्याचेही प्रयत्न सुरू होते.
नेताजी जिवंत आहेत. ते सैबेरियामध्ये रशियाच्या कैदेत आहेत. त्यांनी संन्यास घेतला आहे. ते साधू बनून वावरत आहेत. ते नेहरूंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी हजर होते. नेहरू त्यांना भारतात येऊ देत नाहीत. नेहरूंच्या सांगण्यावरून स्टॅलिनने त्यांची हत्या केली. अशा अफवांना साठच्या दशकात जोर आला होता. शौलमारीबाबा हे प्रकरण त्यातलेच एक. प. बंगालमधील कूछबिहार जिल्ह्यातील फालाकाटानजीक शौलमारी येथे या चेनस्मोकर बाबाचा आश्रम होता. तो आपण नेताजी असल्याचे सांगत असे. नेताजींच्या अनेक अनुयायांनाही तसे वाटत होते. नेताजींनी स्थापन केलेल्या बंगाल व्हॉलिंटियर्स या गटाचे एक सदस्य, माजी क्रांतीकारी सत्य गुप्ता यांनी तर पत्रकारपरिषद घेऊन तेच नेताजी असल्याचे जाहीर केले. यानंतर पोलीस आणि आयबीने त्यांच्यावर नजर ठेवणे सुरू केले. त्यांच्या दाव्याची खातरजमा करणे सुरू केले. त्याचे अनेक गोपनीय अहवाल आज उपलब्ध आहेत. पण हा बाबा तोतयाच निघाला. वेळोवेळी अशी तोतयांची बंडे माजत होती. नेताजी हयात आहेत ही अनेकांची श्रद्धा बनली होती. त्यासाठी ते कशावरही विश्वास ठेवण्यास तयार होते. विविध षड्यंत्र सिद्धांत तयार केले जात होते.
।। सेल नं. ४५ ।।


नेताजी रशियाच्या कैदेत असल्याचा दावा करण्यात आघाडीवर होते बिहारमधील काँग्रेसचे (माजी) खासदार सत्यनारायण सिन्हा. त्यांना अनेक परकी भाषा येत होत्या. सोव्हिएत तसेच मुसोलिनीच्या फौजेत ते होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतही काम केले होते. त्यांनी स्वतःहून नेताजी प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्यासाठी ते तैवानलाही जाऊन आले होते. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिले. - ‘नेताजी मिस्ट्री’. त्यात त्यांनी नेताजींना ठेवण्यात आलेल्या तुरूंगाचे नावही दिले होते. ते होते याकुत्स्क आणि कोठडीचा क्रमांक होता ४५.

अपघात झालाच नव्हता. नेताजी रशियाला गेले होते. तेथे स्टॅलिनने त्यांना कैदेत ठेवले. ही माहिती सिन्हा यांना दिली कोझ्लोव्ह नावाच्या गुप्तचराने. तो ट्रॉटस्कीवादी असल्याच्या संशयावरून स्टॅलिनने त्यालाही तुरुंगात टाकले होते. तेथे त्याने नेताजींना पाहिले. हा सिन्हा यांचा दावा. त्यांच्या म्हणण्यानुसार हे त्यांनी नेहरूंना भेटून सांगितले. पण त्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही.

याला जोडून आणखी एक दावा करण्यात येत होता, की नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे परराष्ट्रमंत्रीपद ठेवले. ते नेताजींना संपविण्यासाठी. त्यासाठी त्यांनी रशियात राजदूत म्हणून पाठविले आपल्या बहिणीला. त्यांच्यानंतर तेथे थोर तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पाठविण्यात आले. ते म्हणे नेताजींना जाऊन भेटले.

आपणांस परत यायचे आहे असे पत्रही नेताजींनी नेहरूंना पाठविले होते. पण नेहरूंनी त्यांना येऊ दिले नाही, हे आणखी एक उपकथानक. त्यावरून आता सुब्रमण्यम स्वामींसारखी मंडळी नेहरूंना खुनी ठरवित आहेत. तर साठ-सत्तरच्या दशकात अशा प्रकारचा प्रचार होत होता.

दुसरीकडे एच. व्ही. कामत, अटलबिहारी वाजपेयी, मधु लिमये यांसारखे नेते सरकारकडे नव्या चौकशीची मागणी करू लागले होते. लोकसभेत सातत्याने प्रश्न विचारले जात होते. अनेक खासदारांचा त्याला पाठिंबा होता. पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र पाठवून ते चौकशीची मागणी करीत होते. लोकभावना त्यांच्या बाजूने होती. शाहनवाझ समितीपासून अनेक गोपीनीय कागदपत्रे दडवून ठेवण्यात आली होती असा आरोप करण्यात येत होता. सरकार चौकशीला का घाबरत आहे असा सवाल विचारला जात होता.

अखेर त्या दबावापुढे इंदिरा गांधी झुकल्या. ११ जुलै १९७० रोजी त्यांनी एक सदस्यीय चौकशी आयोग नेमण्याचा आदेश दिला.

।। पुन्हा आयोग ।।

निवृत्त न्या. गोपालदास तथा जी. डी. खोसला. महात्मा गांधी हत्या खटल्यामुळे सर्वपरिचित असलेले हे नाव. त्यांच्याकडे आता नेताजी प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली. तीन वर्षांनी त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. शाहनवाझ आयोगाच्या निष्कर्षांहून तो वेगळा नव्हता. पुढच्या काळात शाहनवाझ आयोगाच्या चौकशीवर अनेक आक्षेप घेण्यात आले होते. नेहरूंवर आरोप करण्यात आले होते. नेताजी कुठेकुठे दिसल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्या सगळ्यांचा समाचार घेतानाच न्या. खोसला यांनी पुन्हा एकदा निसंदिग्धपणे बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले.

सप्टेंबर १९७४ मध्ये हा अहवाल संसदेत मांडण्यात आला. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही यावर श्रद्धा असलेल्यांना तो मान्य असणे शक्यच नव्हते. त्या श्रद्धाळूंनी मोठाच गदारोळ केला. खासदार समर गुहा यांनी तर तो अहवाल तेथेच टराटरा फाडला.
समर गुहा हे सुभाषबाबूंचे सहकारी. नंतर ते प्रजासमाजवादी पक्षात गेले. १९६७ला पहिल्यांदा ते प. बंगालमधून लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर ७१ आणि ७७ची निवडणूकही त्यांनी जिंकली. पुढे ते जनता दल (सेक्युलर)मध्ये गेले. नेताजींचा विमान अपघात मृत्यू झालाच नाही यावर त्यांचा अखेरपर्यंत विश्वास होता. शाहनवाझ आणि खोसला आयोगाने सत्य दडवले आहे असे त्यांचे मत होते.

मधल्या काळात केंद्रात सत्ताबदल झाला होता. जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले होते. आता नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडणे सोपे झाले होते. गुहा यांनी लागलीच ऑगस्ट १९७७ मध्ये संसदेत खोसला आयोगाविरोधात ठराव मांडला. पुन्हा चौकशी आयोग बसवावा अशी मागणी त्यांनी केली. त्याला आपला विरोध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री चरणसिंह यांनी सांगितले. पण मोरारजी सरकारने पुढे गुहा यांना शांत केले.

याच काळात १९७८ मध्ये, खोसला आयोगाच्या निष्कर्षांची चिरफाड करणारे पुस्तक गुहा यांनी प्रसिद्ध केले. त्याचे नाव ‘नेताजी डेड ऑर अलाइव्ह?’(पुढे खोसला यांनीही ‘द लास्ट डेज ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस’हे पुस्तक लिहिले.) या पुस्तकाचे प्रकाशन केले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी. त्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले, ‘भारत पुन्हा एकदा नेताजींबाबतच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करील. नेताजी रशियात असतील, तर त्यांना परत पाठवावे असा आग्रह रशियाकडे धरील.’नेताजी रशियामध्येच असावेत हा संशय किती खोलवर आणि किती वरपर्यंत रूजला होता याचे हे उदाहरण.

या षड्यंत्र सिद्धांतात विसंगती अशी की त्याचवेळी नेताजी भारतात साधू बनून राहात आहेत असेही अनेकांना वाटत होते. खुद्द गुहा यांनीच तसे जाहीर केले होते. तेही भर संसदेत.

२८ ऑगस्ट १९७८ रोजी लोकसभेत बोलताना मोरारजी देसाई यांनी गुहा यांना त्यांचा चौकशी आयोग नेमण्याचा ठराव मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी बोलताना गुहा म्हणाले, अशी चौकशी करण्याची गरजच नाही. मला माहीत आहे नेताजी जिवंत आहेत. ते स्वतंत्र आहेत.
यानंतर पाचच महिन्यांनी गुहा यांनी त्याचा ‘पुरावा’च सादर केला. कोलकात्यात एका पत्रकारपरिषदेत त्यांनी नेताजींचे एक वर्षांपूर्वी ‘घेतलेले’छायाचित्र जाहीर केले. ‘पिता आणि पुत्रीने रचलेल्या कटाचे पितळ विद्यमान सरकारकडून उघडकीस आणण्यात येत आहे,’असे ते म्हणाले. २३ जानेवारी १९७९ ला वर्तमानपत्रांत ही बातमी प्रसिद्ध झाली. पुन्हा एकदा देशात संशयाचे वातावरण निर्माण झाले. पण...
गुहा यांनी सादर केलेले छायाचित्र बनावट आहे. शरदचंद्र बोस यांच्या धडावर सुभाषबाबूंचे डोके चिकटवून ते तयार करण्यात आले आहे असे उघडकीस आले.
गुहा यांचे सारेच प्रयत्न फसले. छायाचित्र बनावट निघाले. नवा चौकशी आयोग स्थापण्याची मागणीही हवेतच विरली.

ती पूर्ण होण्यास आणखी वीस वर्षांचा काळ लोटणार होता.0000


सन १९९९.

त्या अपघातास आता ५४ वर्षे उलटून गेली होती.

स्वातंत्र्य, फाळणी, युद्धे, आणीबाणी, दहशतवाद, रंगीत टीव्ही, मंडल-कमंडल, आर्थिक उदारीकरण, संगणक क्रांती... राष्ट्राचा जीवनरथ पुढे धावत होता. नुकतीच देशाने दिल्लीतील सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या हाती सोपविली होती. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेवर होते. नेताजी प्रकरण हे नेहरूंचे षड्यंत्र आहे असे मानणा-यांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या होत्या. आता तरी नेताजी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असे त्यांना वाटत होते.
ऐंशीच्या दशकात हे प्रकरण काहीसे लोकविस्मृतीच्या फडताळात जाऊन पडले होते. पण तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी १० ऑक्टोबर १९९१ रोजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांना पाठविलेल्या पत्राने हे निद्रिस्त वादळ पुन्हा उठले.
व्ही. पी. सिंग सरकारच्या काळापासूनच नेताजींचा अस्थिकलश भारतात आणण्यासाठीच्या हालचाली सुरू होत्या. (गोपनीय फाइल – पीएमओ ८००/६/सी/१/९०-पॉल) नेताजींच्या कुटंबातील काही सदस्यही त्याच्या बाजूचे होते, तर नेताजींची एकुलती एक कन्या डॉ. अनिता बोस-पाफ यांना मात्र त्याबद्दल संशय होता. नेताजींचा त्या अपघातात मृत्यू झाला असणे शक्य आहे, असे त्यांचे मत. परंतु रेंकोजी मंदिरातील अस्थिकलशाबाबत त्या काहीशा साशंक होत्या. त्याबद्दलचा वाद सुरू असतानाच नरसिंह राव यांनी नेताजींना मरणोत्तर भारतरत्न द्यावे असा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला. त्या संदर्भातील गोपनीय फाइलींनुसार (पीएमओ ८७०/११/पी/१६/९२-पॉल) २३ जानेवारी १९९२ रोजी हा किताब त्यांना अर्पण करावा अशी सूचना राव यांनी केली होती. राष्ट्रपतीभवनातून २२ जानेवारी रोजी तसे पत्रक काढण्यात आले. ते पाहताच नेताजी हयातवादी संतापले. नेताजींना मरणोत्तर भारतरत्न देणे म्हणजे त्यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करणे. त्याला त्यांचा विरोध होता.
या वादामुळे पुन्हा एकदा नव्या चौकशीची मागणी जोर धरू लागली. काही जण न्यायालयात गेले. अशा चौकशीला वाजपेयी सरकारचा विरोध असण्याचे काही कारणच नव्हते. या चौकशीतून काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचा – म्हणजे नेहरूंचा – पर्दाफाश होईल, अशी कुजबूज नेहमीच सुरू असे. ती खरे ठरणे म्हणजे भाजपला सत्तेचा अमरपट्टा मिळणे. तशात आता कोलकाता उच्च न्यायालयानेही चौकशीचे निर्देश दिले होते.

अखेर १४ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी सरकारने नेताजी प्रकरणाच्या चौकशीसाठी नवा आयोग नेमण्याची घोषणा केली. त्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मनोजकुमार मुखर्जी यांच्यावर सोपविली.


।। बनाव? ।।

मुखर्जी आयोगासमोर एक महत्त्वाचा प्रश्न होता. नेताजी हयात आहेत की नाहीत?हयात नसतील तर मृत्यू कधी झाला?
त्यांच्या मृत्यूच्याही पाच कथा होत्या, पाच तारखा होत्या. (मुखर्जी अहवाल, खंड १, प्रकरण ३,४)

१. १५ ऑगस्ट १९४५ रोजी लाल किल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली. (हा ‘नेताजीके लाल केलिये होत्त्या’या पुस्तकाचे लेखक उषारंजन भट्टाचारजी यांचा दावा.)
२. १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला.
३. १९७७ मध्ये डेहराडूनमध्ये त्यांचे निधन झाले.
४. २१ मे १९७७ रोजी श्योपूरकलाँ (मध्य प्रदेश) येथे ते मृत्युमुखी पडले.
५. १६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला.

या सर्व कहाण्या आणि तारखा मुखर्जी आयोगाने उडवून लावल्या. लाल किल्ल्यातील हत्येची कहाणी ही तर हास्यास्पदच होती. श्योपूरकलाँची कहाणी त्याहून भन्नाट होती. त्यानुसार १९४६ मध्ये मध्य प्रदेशातील पंडोला नावाच्या खेड्यात एक विमान कोसळले. त्यात तिघे जण होते. नेताजी, कर्नल हबिबुर रहमान आणि... अडाल्फ हिटलर!ते तिघेही वाचले. पैकी नेताजी श्योपूरकलाँमध्येच ज्योतिर्देव या नावाने साधू बनून राहिले. मुखर्जी यांनी त्यासंदर्भात पाच साक्षीदारांची तपासणी केली आणि निष्कर्ष काढला. – या नावाचा साधू तेथे होता. पण तो नेताजी नव्हे.
यांतील दोन दाव्यांची आयोगाने कसून चौकशी केली. एक म्हणजे विमान अपघात आणि दुसरा फैजाबादमध्ये मृत्यू. आयोगाने जपान, तैवान, रशिया आदी देशांना भेटी दिल्या. तेथील, तसेच केंद्र सरकारच्या ताब्यातील गोपनीय फाइलींचा अभ्यास केला. विविध साक्षीदारांची तपासणी केली. यातून आयोगासमोर एक बाब स्पष्ट झाली की विमान अपघाताबाबतच्या विविध साक्षीदारांच्या माहितीमध्ये तफावत आहे, विसंगती आहे. एक तर तो अपघात आणि त्यानंतरचा नेताजींचा मृत्यू याबाबत ठोस कागदपत्रेच नाहीत. नेताजींवर ज्या रूग्णालयात उपचार करण्यात आले होते, तेथील संबंधितांच्या जबान्या एकमेकांशी मेळ खात नाहीत. त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध नाहीत. नानमॉन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार केले डॉ. कॅ. तेनायोशी योशिमी यांनी. शाहनवाझ समितीसमोर त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार, त्यांनीच नेताजींचे मृत्यूप्रमाणपत्र दिले. त्यात मृत व्यक्तीचे नाव होते कता काना (जपानीत चंद्रा बोस). पण जपानी सरकारने १९५५ रोजी भारतास दिलेल्या मृत्यूप्रमाणपत्रात इचिरो ओकुरा असे भलतेच नाव होते. डॉ. योशिमी यांचे सहकारी डॉ. तोयोशी त्सुरूता यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे प्रमाणपत्र दिले होते. असा सगळाच घोळ.
मुखर्जी आयोगाच्या निष्कर्षांनुसार नेताजींना सुखरूप रशियाला जाता यावे यासाठी जपानी अधिकारी आणि हबिबुर रहमान यांनी मिळून हा डाव रचला होता. इतरांची दिशाभूल करण्यासाठी इचिरो आकुरो यांचा मृत्यू आणि अंत्यसंस्काराची कागदपत्रे नेताजींची म्हणून दाखविण्यात आली.

तात्पर्य – तैवानमधील अपघात हा बनाव होता.
मग त्यानंतर नेताजींचे काय झाले?ते रशियाला गेले?
मुखर्जी आयोगाचे यावर उत्तर एवढेच, की पुराव्यांअभावी त्याचे उत्तर देता येत नाही. पण नेताजी हयातवाद्यांकडे त्याचे उत्तर आहे. डॉ. पुरबी रॉय या त्यांपैकी एक. त्या इतिहास संशोधक. जाधवपूर विद्यापीठात त्या आंततराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवायच्या. ‘द सर्च फॉर नेताजी :न्यू फाईंडिग्ज’हे त्यांचे गाजलेले पुस्तक. त्यांच्या संशोधनानुसार नेताजी रशियामध्येच गेले. तेथेच ‘गायब’झाले. ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’या पुस्तकाचे लेखक पत्रकार अनुज धर यांचेही मत नेताजी रशियात गेले असेच आहे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार, ते तेथून परतले. भारतात आले. साधू बनून राहिले. त्यांचे नाव गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी.


०००००


गुमनामी बाबांची कहाणी सुरू झाली ती त्यांच्या मृत्यूने.

१६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शरयू किनारी त्यांच्यावर १३-१४ लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाला. फैजाबादमधील नागरिकांच्या दृष्टीच्या तोवर त्यात विशेष असे काहीही नव्हते. वादळ उठले, ते ‘नये लोग’या स्थानिक दैनिकातील एका बातमीने. बाबांच्या मृत्यूनंतर ४२ दिवसांनी, २८ ऑक्टोबर रोजी ती प्रसिद्ध झाली. तिचा मथळा होता –

‘फैजाबाद में अज्ञातवास कर रहे नेता सुभाषचन्द्र बोस नहीं रहे ??’
चंद्रकुमार श्रीवास्तव आणि रामतीर्थ विकल या पत्रकारांच्या त्या वृत्ताने स्वतंत्र भारतातील एका सर्वांत मोठ्या गूढकथेला जन्म दिला.
या कथेने एक काम केले. नेताजी रशियात आहेत हे नेहरूंना ठावूक होते,डॉ. राधाकृष्णन नेताजींना रशियात भेटले होते,नेहरूंनी नेताजींना भारतात येऊ दिले नाही,स्टॅलिनला सांगून तुरूंगात डांबले,नेताजींची हत्या करविली,असे सर्व आरोप धुवून टाकले. भगवानजी बनलेल्या नेताजींना गुमनामीतच राहायचे होते, तर मग नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी त्यांच्याबाबतच्या गोपनीय फायली जाणीवपूर्वक नष्ट केल्या या आरोपातही काही अर्थ राहात नाही. इतरांनी त्यांचे अस्तित्व दडवून ठेवले, तर ते चांगलेच केले असे याबाबत म्हणावे लागेल.
या कहाणीनुसार १९६४मध्ये गुमनामी बाबा फैजाबादला आले. तत्पूर्वी ते उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी राहात होते. ६४ नंतर ते अयोध्या आणि बस्ती येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. १९८३पासून फैजाबादमधील रामभवन या बंगल्याच्या आवारातील एका घरात ते राहू लागले. डॉ. आर. पी. मिश्र आणि डॉ. प्रियब्रत बॅनर्जी हे त्यांचे जवळचे अनुयायी. त्यांनी तेथे बाबांच्या निवासाची व्यवस्था केली होती. या बंगल्याचे मालक होते निवृत्त दंडाधिकारी गुरुबसंत सिंग. त्यांचा मुलगा शक्तीसिंग याने दिलेल्या माहितीनुसार बाबा कोणाला भेटत नसत. चेहरा दाखवत नसत. बोलले, तर पडद्याआडून बोलत असत. खुद्द शक्तीसिंग यांनीही त्यांना कधी पाहिलेले नव्हते. ‘नेताजी लिव्हिंग डेंजरसली’(लेखक – पत्रकार किंगशुक नाग) या पुस्तकात शक्तीसिंग यांचा एक किस्सा दिला आहे. त्यांच्या ओळखीचे एक पोलिस अधिकारी होती. बाबांचे रहस्य उलगडण्याचा त्यांनी चंग बांधला होता. एके सकाळी ते काही पोलिसांना घेऊन रामभवनात आले. अचानक काही तरी झाले आणि ते आले तसे मागच्या पावली निघून गेले. बहुधा कोणत्या तरी अनामिक शक्तीच्या प्रभावामुळे तसे घडले असावे!थोडक्यात, या बाबांमध्ये दैवी शक्ती होत्या!!

त्यांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार, बाबांना उत्तम हिंदी, बंगाली आणि इंग्रजी येत होती. त्यांच्या बोलण्या-वागण्यावरून तेच नेताजी आहेत, यावर त्यांच्या अनुयायांचा विश्वास होता. त्यांत अनेक प्रतिष्ठित, उच्चशिक्षित होते. त्यातील काही तर प्रत्यक्ष सुभाषबाबूंना भेटलेले होते.
या लोकांना ते अधुनमधून आपल्या पूर्वायुष्यातील काही गोष्टी सांगत. त्यांत युद्धाचे, राजकारणाचे अनेक संदर्भ असत. त्यांची अशी अनेक वक्तव्ये, किस्से एका बंगाली पुस्तकात दिलेले आहेत. त्याचे नाव – ‘ओई महामानब आसे.’लेखक आहेत चरणिक. हे अर्थातच टोपणनाव आहे. या पुस्तकात ७०-८०च्या दशकातील अफगाणिस्तानातील सोव्हिएत आक्रमणासारख्या आंतरराष्ट्रीय घटनांचेही उल्लेख येतात.
अशा गोष्टांवरून त्यांच्या अनुयायांची खात्रीच पटलेली होती, की ते नेताजीच आहेत. लीला रॉय या त्यातील एक. त्या क्रांतिकारी नेत्या होत्या. सुभाषबाबूंसमवेत त्यांनी काम केले होते. संसदेत त्यांचे छायाचित्र लावलेले आहे. तर अनुज धर यांच्या पुस्तकानुसार लीला रॉय या स्वतः गुमनामी बाबा यांना भेटल्या होत्या आणि त्या भेटीतून त्यांची खात्री पटली होती, की ते नेताजीच आहेत. १९७०मध्ये लीला रॉय यांचे निधन झाले. त्यांच्याप्रमाणेच आणखी एक महत्त्वाची व्यक्ति बाबांच्या संपर्कात होती. ती म्हणजे डॉ. पबित्रमोहन रॉय. हे आझाद हिंद सेनेतील गुप्तचर अधिकारी. त्यांच्यामुळेच लीला रॉय यांना बाबांची ओळख झाली.
आता प्रश्न असा येतो, की भारतात येण्यापूर्वी ते कुठे होते?
‘ओई महामानब आसे’या पुस्तकानुसार बाबा सांगत, की रशियातून ते १९४९ला बाहेर पडले. तेथून ते चीनला गेले. तेही माओ-त्से-तुंग यांचे अतिथी म्हणून. १ ऑक्टोबर १९४९ला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा जन्म झाला. त्या कार्यक्रमाला बाबा उपस्थित होते. याचा पुरावा?७ ऑक्टोबर १९४९ रोजी शरदचंद्र बोस यांच्या ‘नेशन’या दैनिकाने पहिल्या पानावर ‘नेताजी इन रेड चायना’अशी बातमी प्रसिद्ध केली होती. ती बातमी आधारलेली होती एका विदेशी वृत्तसंस्थेच्या पत्रकाराच्या माहितीवर. त्याच्याही पुढची धक्कादायक बाब म्हणजे तमिळनाडूतील फॉरवर्ड ब्लॉकचे नेते आणि माजी खासदार मुथुरामलिंगम थेवर यांनी, आपण चीनमध्ये गुप्तपणे नेताजींना भेटलो, असा जाहीर दावा केला होता.
तर चीनमधून नेताजी १९५५ मध्ये भारतात परतले. येथे आल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. भगवानजी, महाकाल, गुमनामीबाबा या नावाने ते ओळखले जाऊ लागले. १९८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्याजवळ सापडलेल्या सामानावरून तर गुमनामी बाबा हेच नेताजी यावर जणू शिक्कामोर्तबच झाले. या सामानात होती अलेक्झांडर सोल्त्झेनित्सिन यांचे ‘गुलाग आर्चिपेलॅगो’, ब्रिगे. जे पी दळवी यांचे ‘हिमालयन ब्लंडर’, सुरेशचंद्र बोस यांचा ‘डिसेंटिएन्ट रिपोर्ट’, झालेच तर शेक्सपिअरची काही नाटकं, चार्ल्स डिकन्स, पी जी वूडहाऊस यांच्या कादंब-या, कुलदीप नय्यर, मौलाना आझाद यांची राजकीय विषयांवरील अशी बरीच पुस्तके. विशेष म्हणजे त्यांत बर्म्युडा ट्रँगल (चार्लस बेर्लिट्झ), फ्लाईंग सॉसर्स फेअरवेल (जॉर्ज अॅडम्स्की), लाईफ बियॉंड डेथ (स्वामी अभेदानंद), सेलिब्रेटेड क्राइम्स (आय जी बर्नहॅम) अशीही पुस्तके होती. याशिवाय एक कोरोना टाइपरायटर, रोलेक्स घड्याळ, नकाशे, वर्तमानपत्रांची अनेक कात्रणे, पत्रे अशा गोष्टीही त्यांच्याकडे सापडल्या. या पत्रांमध्ये एक पत्र होते राष्ट्रीय स्वयंस्वेक संघाचे गुरूजी माधव गोळवलकर यांचे. मात्र ते ‘स्वामी श्री विजयानंददी महाराज’यांना उद्देशून लिहिलेले होते.

नये लोग आणि त्यानंतर अन्य काही वृत्तपत्रांत याबद्दलच्या बातम्या आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी होऊ लागली. हे सगळे पाहून सुरेशचंद्र बोस यांची कन्या आणि नेताजींची पुतणी ललिता बोस या उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांना भेटल्या. बाबांच्या साहित्याचा लिलाव करण्यात येणार होता. तो रोखावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी नंतर त्या उच्च न्यायालयातही गेल्या. त्यावर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि तीन महिन्यांत नेताजींचे स्मारक बांधावे असा आदेश न्यायालयाने दिला.

या सगळ्या गोष्टींवरून बाबा हेच नेताजी असे मानण्यास कोणाची हरकत असेल?अनेक जण छातीठोकपणे तेच सांगत आहेत. परंतु काहींचे मत याहून वेगळे आहे.

‘नये लोग’मधील त्या बातमीनंतर फैजाबादमधील ‘जनमोर्चा’या वृत्तपत्राचे संपादक शीतलसिंह यांनी आपले काही बातमीदार या प्रकरणाच्या मागे लावले. बाबा हेच नेताजी असल्याचे आझाद हिंद फौजेतील गुप्तचर अधिकारी पबित्रमोहन रॉय सांगत असल्याचा बाबांच्या अनुयायांचा दावा होता. शीतलसिंह यांनी कोलकात्यात जाऊन रॉय यांची मुलाखत घेतली. जनमोर्चाच्या ६ नोव्हें. १९८५च्या अंकात ती प्रसिद्ध झाली. त्यात रॉय यांनी म्हटले होते, ‘आम्ही नेताजींच्या शोधात कोहिमापासून पंजाबपर्यंत सगळे साधू आणि रहस्यमयी व्यक्तींना भेटत आहोत. त्याच प्रकारे आम्ही बाबाजींना बस्ती, फैजाबाद आणि अयोध्येत भेटलो. परंतु मी ठामपणे सांगतो, ते नेताजी सुभाषचंद्र बोस नाहीत.’आपण त्यांना पत्रं पाठविल्याचे त्यांनी कबूल केले. पण त्या एकाही पत्रात आपण त्यांना नेताजी म्हणालेलो नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. मग प्रश्न असा येतो, की बाबांकडे नेताजींसंबधीची कागदपत्रे, छायाचित्रे, विविध पुस्तके सापडली त्याचे काय?रॉय यांच्या म्हणण्यानुसार, ‘त्यात त्यांना रस असेल म्हणून त्यांनी ती जमविली असतील. इतर अनेक लोकांनीही तसे साहित्य जमविले असू शकते.’
थोडक्यात, हे बाबा नेताजी नव्हेत. नेताजींचे पुतणे शिशिर बोस यांचेही हेच मत होते. डॉ. पुरबी रॉय याही तेच सुचवितात. त्यांच्या संशोधनाचा एकच निष्कर्ष आहे. तो म्हणजे नेताजींच्या ‘गायब’होण्याचे रहस्य रशियात दडले आहे.
मुखर्जी आयोगही गुमनामी बाबांना नेताजी मानण्यास तयार नाही. आयोगाने याबाबत अनेक साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. अनेक कागदपत्रे तपासली. गुमनामी बाबांकडचे साहित्य पाहिले. त्यांचे आणि नेताजींचे हस्ताक्षर जुळवून पाहण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या सामानात काही दात सापडले होते. त्यातील पाच दात डीएनए चाचणीसाठी पाठविले. आणि त्या सगळ्या चौकशीतून एकच निष्कर्ष काढला - ‘भगवानजी किंवा गुमनामी बाबा हे नेताजी होते हे सिद्ध करण्यास एकही योग्य पुरावा नसल्यामुळे, ते फैजाबाद येथे १६ सप्टेंबर १९८५ रोजी मरण पावले की काय, याचे उत्तर देण्याची आवश्यकता नाही.’
मग आता प्रश्न उरतो की हे नेताजींना पाहिलेले, त्यांच्या जवळचे लोक बाबांनाच नेताजी मानत होते, त्याचे काय?याचे उत्तर दुस-या एका प्रश्नातच दडलेले आहे. तो म्हणजे – शौलमारीबाबा हे नेताजी असल्याचे माजी क्रांतीकारी सत्य गुप्ता यांनी तर पत्रकारपरिषद घेऊन जाहीर केले होते त्याचे काय?
यानंतर सवाल येतो, की मग गुमनामी बाबा नक्की होते तरी कोण?याचे उत्तर अद्याप अंधारातच आहे. पण ‘स्क्रोल.इन’या वृत्तसंकेतस्थळानुसार, त्यांचे खरे नाव कृष्णदत्त उपाध्याय तथा कप्तानबाबा असावे. असा संशय व्यक्त करणारे एक पत्र ‘जनमोर्चा’च्या २ नोव्हेंबर १९८५च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते. अयोध्येतील गायत्री ब्रह्मचर्याश्रम संस्कृत विद्यालयाचा तो एक विश्वस्त होता. १९५८ मध्ये विश्वस्त मंडळातील वादातून त्याने पं. ब्रह्मदेव शास्त्री या दुस-या एका विश्वस्ताचा गोळी घालून खून केला आणि तेव्हापासून तो पसार झाला. त्या पत्रानुसार तो नेपाळमध्ये पळाला आणि नंतर काही काळाने बस्ती येथे येऊन राहू लागला. शेठ ईश्वरदास बेनीप्रसाद हे कोलकात्यातील बडे व्यापारी उपाध्यायचे निकटवर्ती. त्यांचा गुमनामीबाबांशीही संबंध होता. परंतु गुमनामीबाबा म्हणजे कप्तानबाबा याचे ठोस पुरावे नाहीत. तसे ते नेताजी असल्याचेही ठोस पुरावे नाहीत. मुखर्जी आयोगानेच तसे म्हटले आहे.

या आयोगाने ७ नोव्हें. २००५ रोजी सादर केलेल्या अहवालाचे निष्कर्ष होते – १. नेताजी आता हयात नाहीत. २. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला नाही. ३. जपानमधील मंदिरातील रक्षा त्यांच्या नाहीत. आणि ४. त्यांचा अन्य कोणत्या प्रकारे वा कुठे मृत्यू झाला याचे ठोस पुराव्याअभावी उत्तर देता येत नाही.

हा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला. परंतु त्याने नेताजींचे रहस्य अधिकच गडद झाले. नेताजींचे अपघाती निधन झाले नसेल, तर कसे झाले असा गूढप्रश्न त्यातून वर आला होता. त्याच्या उत्तराचा शोध गुमनामीबाबांच्या दिशेने घेऊन जात होता. त्यालाही कारणीभूत न्या. मुखर्जीच ठरले होते. कारण गुमनामीबाबा हेच नेताजी असल्याचे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगून टाकले होते. त्या मतामुळे रशिया पक्षापेक्षा गुमनामी पक्षाचे पारडे जड झाले होते.

पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय आदींकडे असलेल्या गोपनीय फायलींमध्येच या रहस्याचे उत्तर असल्याची अनेकांची खात्री होती. या फायली खुल्या कराव्यात अशी संशोधकांची, रहस्यशोधकांची मागणी होतीच. ती आता नव्याने जोर धरू लागली होती. यावेळी तिला राजकीय बळही मिळाले होते.


।। रहस्यभेद ।।

२०१४ साल उजाडले ते नरेंद्र मोदी नावाचे वादळ घेऊनच. देशात निवडणुकांचा माहोल होता. मोदींची लाट होती. काँग्रेस आखाड्यात येण्याआधीच चीतपट झालेली होती. पण कोठेही हयगय करून चालणार नव्हते. कारण देशातील प्रत्येक मतदारसंघात कमळ फुललेच पाहिजे अशी मोदींची मनीषा होती. तेव्हा मिळेल त्या मार्गाने नेहरू-गांधी घराण्याच्या जिव्हारी घाल घालण्यात येत होते. त्याची एक संधी दिली २३ जानेवारीने. हा नेताजींचा ११७वा जयंतीदिन. त्याच्या आदल्या दिवशी रात्री ८.३३ वाजता भाजपचे तत्कालिन अध्यक्ष राजनाथसिंह यांनी एक ट्विपण्णी केली. – ‘नेताजींचा मृत्यू कसा आणि कोणत्या परिस्थितीत झाला हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. केंद्र सरकारने त्यांच्या मृत्यूच्या रहस्याचा पर्दाफाश केला पाहिजे.’२३ जानेवारीला कटक येथे जाहीरसभेतही त्यांनी याचाच पुनरूच्चार केला. त्या एका भाषणाने, गांधी-नेहरू घराण्याचा नेताजींना कसा विरोध होता याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.
तशी ही चर्चा जुनीच. वस्तुतः ती चर्चा कमी आणि चिखलफेकच जास्त. हे राजकारणातील एक मोठे अस्त्र आहे. राजकीय विरोधकांवर चिखलफेक करायची.वाट्टेल तशी नि सातत्याने करायची. सतत तेच ते आरोप केले की लोकांनाही ते खरे वाटून जातात. माणूस बदनाम होतो. पं. जवाहरलाल नेहरूंबाबत गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. नेहरूंच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय विचारांना विरोध असणे वेगळे. त्यावर विवेकनिष्ठ टीका होऊ शकते. परंतु या मंडळींना नेहरूंचे चारित्र्यहनन करून फिदीफिदी हसण्यात अधिक रस.त्यातून मग नेहरू हे एका मुस्लिम वेश्येचे पुत्र, बाईलवेडे,मेले ते लैंगिक आजाराने, येथपासून एडविनाशी त्यांचे लैगिक संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी देशाची फाळणी स्वीकारली येथपर्यंतचे आरोप करण्यात आले. या आरोपांनी इंटरनेटवरील पानेच्या पाने भरली असून, त्यातून नेहरूंचे एक खलनायकी मिथक तयार केले जात आहे. त्याचा दुसरा स्तर हा नेहरूंविरोधात स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांना उभे करणे असा आहे. नेहरूंनी नेताजींचा खून केला हा आरोप ही त्या मिथक निर्मितीचीच पैदास.
वस्तुतः नेताजी आणि नेहरूंमध्ये जो वाद होता तो खुर्चीसाठी नव्हता. १९२९, १९३६ आणि १९३७ साली नेहरुंना काँग्रेस अध्यक्ष करण्यात सुभाषबाबूंचा हात होता आणि १९३८ साली सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते नेहरूंच्या पाठिंब्यामुळे.पुढे १९३९ साली ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले. तेव्हा मात्र नेहरू त्यांच्या बाजूने नव्हते. गांधीही नव्हते आणि सरदार वल्लभभाई पटेलही नव्हते. गांधींनी नेहरूंना प्रतिस्पर्धी नको म्हणून सुभाषबाबूंना बरोबर अध्यक्षपदावरून उडवले असे मिथक या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे. त्यात त्या निर्मात्यांची चूक नाही. आजच्या राजकारणाच्या क्षुद्र चष्म्यातून पाहिले की असेच दिसणार. उद्या हाच चष्मा अडवानी आणि मोदी यांच्यातील सत्तास्पर्धेला लावला तर कसे चित्र दिसेल? मुळात तो संघर्ष सत्तेचा नव्हता, तर काँग्रेसने पुढचा प्रवास कोणत्या मार्गावरून करायचा याचा होता. वाद लढ्याच्या डावपेचांबद्दलचा होता. त्यातून दोघांत नक्कीच कटूता निर्माण झाली होती. पण तिचे स्वरूप आज आपण समजतो तसे नव्हते. आझाद हिंद सेनेतील ले. कर्नल गुरुबक्षसिंग धिल्लाँ यांच्या नेतृत्वाखालील चौथ्या गुरिला रेजिमेन्टचे नाव नेहरू ब्रिगेड होते.गांधीजी, मौलाना आझाद यांच्या नावाच्याही रेजिमेन्ट होत्या. या प्रतिसरकारने गांधी जयंतीची सुटी जाहीर केली होती. हे सगळे नेहरू व सुभाषबाबू हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते या थापांच्या विरोधात जाणारे आहे.

आणि तरीही नेहरूंना नेताजींचे भय वाटत होते. ते भारतात आले तर आपली पंतप्रधानकी जाईल असे वाटत होते. म्हणून त्यांनी नेताजींबाबतची सगळी माहिती दडवून ठेवली. अनेक फायली नष्ट केल्या. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास नकार दिला. नंतर आयोग नेमून रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला असे आरोप केले जात होते. गोपनीय फायली खुल्या केल्या जात नाहीत, याचा अर्थ ते आरोप खरे आहेत असे मानले जात होते.
नेताजी प्रकरणाची चौकशी करणा-या तिन्ही आयोगांची एकच ओरड होती. गोपनीय फायलींची अनुपलब्धता. मुखर्जी आयोगाच्या अहवालात ‘मर्यादा आणि बंधने’या मथळ्याखाली मुखर्जी यांनी स्पष्टपणे ही तक्रार नोंदविली आहे. त्यांनी ‘१२(२२६)/५६-पीएम’या क्रमांकाच्या फाईलचे उदाहरण दिले आहे. ही फाईल त्यांनी मागितली. त्यावर ती नष्ट करण्यात आली आहे असे उत्तर पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिले. खोसला समितीनेही ही फाईल मागितली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याबाबत कळविले होते, की या फाईलमध्ये केवळ अन्य फायलींमधील कागदपत्रांच्या प्रती होत्या. तेव्हा ती नष्ट करण्यात आली. या फाईलमध्ये नेताजी प्रकरणाच्या चौकशीसंबंधी कॅबिनेटच्या बैठकीतील चर्चेचे वृत्तान्त होते. ते कॅबिनेट सचिवालयाकडे असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाने मुखर्जी आयोगाला कळविले. पण ती कागदपत्रे काही त्यांना अखेरपर्यंत मिळू शकली नाहीत. या काळात पंतप्रधानपदी होते अटलबिहारी वाजपेयी.
असेच दुसरे उदाहरण ‘२/६४/७८-पीएम (पॉल. सेक्शन)’या पंतप्रधान कार्यालयातील फाईलचे. नेताजींबाबत काही नवीन अधिकृत कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत, असा उल्लेख पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेत केला होता. आधी तशी कोणतीही कागदपत्रे नाहीत असे आयोगाला सांगण्यात आले. नंतर उपरोक्त गोपनीय फाईल पाठविण्यात आली. पण त्यात काही तशी कागदपत्रे नव्हती. हा किस्सा वाजपेयींच्या काळातलाच.

याचे दोन अर्थ होतात. आधीच्या सरकारांनी नेताजींबाबतची काही महत्त्वाची कागदपत्रे नष्ट केली आणि केंद्रात कोणाचेही सरकार असो, त्यांचा गोपनीय फायली जाहीर करण्यास विरोध होता. हे पुढे मोदी सरकारच्या काळातही दिसून आले.

मनमोहन सरकारने नेताजींच्या फायली खुल्या कराव्यात अशी जोरदार मागणी करीत आधीच्या सर्व काँग्रेस सरकारांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करणारे राजनाथसिंह त्यानंतर चारच महिन्यांनी केंद्रात गृहमंत्री झाले. त्यामुळे आता सर्व फायली खुल्या होणार आणि गांधी-नेहरू घराण्याची कृष्णकृत्ये जगजाहीर होणार, असे वातावरण निर्माण झाले होते. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी या फायलींबाबत प्रश्न सादर केला होता. त्याला १७ डिसेंबर २०१४ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लेखी उत्तर दिले – नेताजींबाबतच्या गोपनीय फायली खुल्या करणे भारताच्या परराष्ट्रांबरोबरच्या संबंधांस हितकारक नाही!
यावरून मोदी सरकारवर टीका होऊ लागली होती. लोकांचा दबाव वाढत चालला होता. अशात अचानक, २०१५च्या एप्रिलमध्ये ‘इंटेलिजन्स ब्युरो’कडील दोन गोपनीय फायली खुल्या करून नॅशनल अर्काइव्हज् मध्ये ठेवण्यात आल्या. त्यातील कागदपत्रांवरून एक मोठा गौप्यस्फोट झाला. १९४८ ते १९६८ अशा नेहरू, शास्त्री आणि इंदिरा अशा तीन पंतप्रधानांच्या काळात आयबीचे गुप्तचर नेताजींच्या कुटुंबियांवर पाळत ठेवून होते.

ते कशासाठी?चर्चा दोन कारणांची होती. एक म्हणजे नेताजी जिवंत असल्याचे सरकारला माहीत होते आणि दोन – ते परत आले तर नेहरूंचे काही खरे नव्हते. १९५७ची निवडणूक तर ते हरलेच असते, म्हणून.
वस्तुतः नेताजींच्या काही कुटुंबियांवर ब्रिटिश काळापासूनच पाळत ठेवण्यात येत होती. ती पुढेही चालू राहिली. त्याची तार्किक कारणे बरीच होती, ती म्हणजे नेताजी ठिकठिकाणी दिसत असल्याच्या खबरी येत होत्या. नेताजींचे काही नातेवाईक त्या तोतयांच्या संपर्कात होते. काही जणाची कम्युनिस्टांशी संगत होती. पण यावरून नेहरूंना बदनाम करण्याची आयतीच संधी विरोधकांना सापडली.

हा गदारोळ सुरू असतानाच प. बंगालमधील निवडणुकांचे वारे वाहू लागले. ‘नेताजी’हा त्या निवडणुकीतील हुकमाचा पत्ता होता. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या डावात पहिल्यांदा तो उतरवला. पंतप्रधान कार्यालयाने या फायली खुल्या करण्यास नकार दिला असला, तरी आता नेताजींच्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन मोदी त्यांना आश्वासित करू लागले होते. एप्रिल २०१५मध्ये जर्मनीत त्यांनी सूर्यकुमार बोस यांची भेट घेतली. ऑक्टोबर २०१५ मध्ये तर मोदींच्या निवासस्थानी बोस कुटुंबीयांचा मेळाच भरविण्यात आला होता. त्यावेळीही मोदी यांनी पुन्हा फायली खुल्या करण्याचे आश्वासन दिले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या ध्यानी यामागील राजकारण आले नसते, तर नवलच. त्यांनी चलाखीने मोदींचा डाव उलटवला. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी प. बंगाल सरकारच्या ताब्यात असलेल्या ६४ गोपनीय फायली खुल्या केल्या.
आता मोदींना थांबणे शक्य नव्हते. त्यांनी नेताजींच्या ११९व्या जयंतीदिनाचा मुहूर्त साधून १०० गोपनीय फायलींचा पहिला गठ्ठा खुला केला. अवघा देश त्या फायलींतून होणा-या रहस्यभेदाकडे डोळे लावून बसला होता.

एक अपवाद वगळता त्यात धक्कादायक असे काहीच नव्हते. हा अपवाद होता नेताजी युद्धगुन्हेगार असल्याबद्दलचा. नेहरू हे नेताजींना युद्धगुन्हेगार मानत होते आणि त्यासाठी त्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा होती, याचा पुरावा निवडणूक काळात समाजमाध्यमांतून फिरवला जात होता. ते होते एक पत्र. नेहरूंनी १९४५ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांना लिहिलेले. ‘प्रिय मि. अॅटली, तुमचे युद्धगुन्हेगार सुभाषचंद्र बोस यांना स्टॅलिनने रशियात प्रवेश करण्यास परवानगी दिल्याचे मला विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. रशिया हे ब्रिटन-अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहे. तेव्हा रशियाने केलेली ही स्पष्ट दगलबाजी आहे. रशियाने असे करायला नको होते. कृपया याची दखल घ्यावी आणि आपणांस योग्य वाटेल ते करावे,’असे त्यात म्हटले होते. यावरून नेहरू हे कसे खुनशी होते असे सांगितले जात होते. मुळात नेहरूंनी असे कोणतेही पत्र लिहिले नव्हते. त्यांनी ते लिहिण्यास आपणांस सांगितले असा दावा श्यामलाल जैन नावाच्या स्टेनोग्राफरने खोसला आयोगासमोर केला होता.
हा दावा, ते पत्र हे सगळेच कसे खोटे होते ते त्या गोपनीय फायलींनी उघड केले. त्यातील कागदपत्रांनुसार नेताजी हे कधीही ब्रिटनचे युद्धगुन्हेगार नव्हते. तशी कोणतीही यादी ब्रिटिशांनी तयार केली नव्हती.

।। गूढ उलगडले?।।२३ एप्रिल २०१६पासून दर महिन्याला नेताजींबाबतच्या गोपनीय फायली खुल्या केल्या जात आहेत. हेही पहिल्यांदाच घडतेय असे नाही. १९९७ मध्ये संरक्षण मंत्रालयाने आझाद हिंद सेनेबाबतच्या ९९० फायली खुल्या केल्या होत्या. २०१२ मध्ये मनमोहन सरकारने खोसला आयोगाशी संबंधित २७१, तर मुखर्जी आयोगाशी संबंधित ७५९ फायली खुल्या केल्या होत्या.
त्यातून नेताजींचे गूढ उलगडले का? ते हरवलेल्या वा नष्ट केलेल्या फायलींमध्ये तर नव्हते?
२६ एप्रिल २०१६ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अशा दोन फायली गहाळ आहेत. त्यातील एक पंतप्रधानांच्या कार्यालयातील आहे, दुसरी गृहमंत्रालयातील. या दोन्ही फायली कशाबद्दलच्या आहेत?तर नेताजींचा अस्थिकलश भारतात आणण्यासंबंधीच्या.

पण त्याच उत्तरात रिजीजू यांनी जपान आपल्याकडील दोन फायली खुल्या करण्याची शक्यता वर्तविली होती. त्यातून काय बाहेर येते याकडे सगळ्यांचेच लक्ष होते.
मधल्या काळात ज्येष्ठ संपादक, राजकीय इतिहासकार गोविंदराव तळवलकर यांनी नेताजींच्या गूढाचा पाठपुरावा चालवला होता. फेडरल स्टेट इन्स्टिट्यूशन, रशियन स्टेट मिलिटरी अर्काइव्ह, रशियाचे एमव्हीडी (अंतर्गत व्यवहार मंत्रालय) यांच्या ते संपर्कात होते. त्यातून एक गोष्ट उघड झाली. ती म्हणजे रशियाच्या स्टेट अर्काइव्हमध्ये नेताजींबाबतची कागदपत्रे आहेत हा प्रचार खोटा आहे. त्यांच्याकडे तसे काहीही नाही. नेताजी हे याकुत्स्क तुरूंगात होते असे म्हटले जाते. पण तीही अफवा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला ही बातमी खरी की खोटी याची चौकशी ब्रिटिश सरकारने १९४५ मध्ये केली होती. आणि तेव्हा जपानने पाठविलेल्या अंतरिम अहवालात नेताजींचा मृत्यू झाल्याच्य घटनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तळवलकर यांनी प्रयत्नपूर्वक ती सर्व अधिकृत कागदपत्रे मिळविली आहेत.
पण म्हणून नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडले असे म्हणता येईल का?
नेताजींचा मृत्यू झाला, तो विमान अपघातात झाला, हे खरे. पण षड्यंत्रसिद्धांत कधीही सत्य आणि तथ्यांवर अवलंबून नसतो. तो एकदा तयार झाला, की अमर असतो.
आता त्याला जीवदान देण्यासाठी एक नवी चौकशी सुरूच आहे. ती म्हणजे गुमनामीबाबांबद्दलची. उत्तर प्रदेश सरकारने त्यासाठी निवृत्त न्या. विष्णू सहाय यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. प्रतीक्षा आहे ती तिच्या निष्कर्षांची...

त्यातून नवी कोणती रहस्ये निर्माण होतात त्याची.


संदर्भ – 
Report of The Justice Mukherjee Commission Of Inquiry
India’s Biggest Cover-up : Anuj Dhar, Vitsata, 2012
Netaji – Dead or Alive? : Samar Guha, S. Chand and Company, 1978
His Majesty’s Opponent : Sugata Bose, The Belknap Press of Harvard University Press, 2011
Mahatma - Vol 6 (1940-1945) : D. G. Tendulkar, Ministry of I&B, 1953
Mahatma Gandhi – Vol 9 – The Last Phase part 1 - Pyarelal : Navjivan Publishing House, 1956